नवी दिल्ली : लोकसभाध्यक्षांची निवड सहमतीने करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल ठरल्यामुळे बुधवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी व विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये लोकसभेत पहिले शक्तिप्रदर्शन होईल. एनडीएच्या वतीने पुन्हा ओम बिर्ला लोकसभाध्यक्षपदासाठी उमेदवार असून विरोधकांच्या इंडिया आघाडीने काँग्रेसच्या के. सुरेश यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी ४७ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. यापूर्वी १९५२, १९६७ तसेच १९७६ मध्ये लोकसभा अध्यक्षपदसाठी निवडणूक झाली होती.

दोन्ही उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभाध्यक्षांची नियुक्ती बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्यावर विरोधकांशी बोलणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. राजनाथ सिंह यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी सोमवारीपासून फोनवरून संपर्क केला होता व सहमतीने लोकसभाध्यक्षांची  निवड करण्याची विनंती केली होती. राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावावर काँग्रेससह इंडियातील घटक पक्षांनी सहमतीही दाखवली होती. मात्र उपाध्यक्षपदाच्या मुद्द्यावर ही बोलणी फिस्कटली.

उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस आग्रही

लोकसभाध्यक्षपदाची निवड बिनविरोध होईल त्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देतील, असे निश्चित झाले होते. पण लोकसभेचे उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले जावे, अशी मागणी काँग्रेसचे संघटना महासचिव व खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी केली. वास्तविक, उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्याची तयारीही भाजपने दाखवली होती. मात्र, तसे उघड आश्वासन देण्यास भाजपने नकार दिला. विरोधकांचे म्हणणे मान्य केले जाऊ शकते, पण विरोधकांनी अटी घालू नये, असे भाजपचे म्हणणे होते. पण वेणुगोपाल यांनी तडजोड करण्यास नकार दिल्याने भाजप व काँग्रेसमधील बोलणी अपयशी ठरली.

हेही वाचा >>> मराठी खासदारांचा उत्साह; सदस्यत्वाची शपथ घेताना सभागृहात विविध घोषणा

भाजपने मागणी अमान्य केल्यानंतर काँग्रेसने लोकसभाध्यक्षपदासाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. केरळचे खासदार के. सुरेश यांना हंगामी अध्यक्ष करण्यासह भाजपने नकार दिला होता. त्यामुळे काँग्रेसने के. सुरेश यांनाच उमेदवारी दिली. लोकसभाध्यक्षपदासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता भाजपचे ओम बिर्ला व विरोधकांच्या वतीने के. सुरेश यांच्यामध्ये लढत होईल.

राहुल यांची टीका

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राजनाथ सिंह यांनी फोन करून लोकसभाध्यक्षांची निवड बिनविरोध करण्याची विनंती केली होती. परंपरेप्रमाणे उपाध्यक्षपद विरोधकांना देणे अपेक्षित होते, पण भाजपने तसे आश्वासन दिले नाही. मी तुम्हाला पुन्हा फोन करतो असे राजनाथ यांनी खरगेंना सांगितले होते, पण त्यांचा फोनही आला नाही, असे राहुल गांधी यांनी पत्रकारांना सांगितले.

गोयल यांचे प्रत्युत्तर

खरगेंनी राजनाथ सिंह यांना वेणुगोपाल व द्रमुकचे टी. आर. बालू यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते. त्यानुसार राजनाथ यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केली, पण काँग्रेसची हुकूम सोडण्याची आणि स्वत:ला हवे तेच करण्याची अडेलतट्टू सवय अजूनही गेलेली नाही. काँग्रेसने अटी घालण्याचा प्रयत्न केला, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसची नाराजी

ओम बिर्लांच्या उमेदवारीची घोषणा करण्याआधी एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत संयुक्त उमेदवारावर सहमती झाली. इंडिया आघाडीमध्ये मतभेद झाल्याचे स्पष्ट झाले. तृणमूल काँग्रेस वगळता इंडियातील सर्व घटक पक्षांनी के. सुरेश यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली. काँग्रेसने के. सुरेश यांचे नाव निश्चित करण्याआधी तृणमूल काँग्रेसशी सल्लामसलत केली नसल्याबद्दल तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी नाराज झाल्याचे सांगितले जाते.