सहा तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर आणि बहुमताने केलेल्या सुधारणांनंतर ऐतिहासिक लोकपाल विधेयकावर राज्यसभेने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. बुधवारी हे विधेयक लोकसभेत सादर केले जाईल. सत्तारूढ काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात सहमतीचा दुर्मीळ योग साधला गेल्यानंतर या विधेयकाचा राज्यसभेतला मार्ग सुकर झाला होता. दिल्लीत पाय रोवलेल्या ‘आप’ला देशभर हातपाय पसरू देण्यास अटकाव व्हावा, या हेतूने काँग्रेस आणि भाजपने ऐतिहासिक सहमती दाखवली आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राज्यसभेत विधेयक संमत झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून ‘आप’ची कोंडी कायम केली.
समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने विरोध केल्यास चर्चेविनाच हे विधेयक मंजूर करण्याची तयारी काँग्रेस व भाजपने केली होती. सकाळचा एक तास तेलंगणाविरोधकांच्या गोंधळामुळे वाया गेला. त्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पुढाकार घेत समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव व प्रवक्ते प्रा. रामगोपाल यादव यांना चर्चेसाठी बोलविले. तरीही त्यांचे समाधान झाले नाही व समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी लोकपाल विधेयकाविरोधात सभात्याग केला.
जेटली म्हणाले की, २९ डिसेंबर २०११ रोजी लोकपाल विधेयक राज्यसभेत हाणून पाडण्यात आले. परंतु आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भ्रष्टाचार उच्चाटनाच्या दिशेने सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे. समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या सभात्यागावर जेटली म्हणाले की, लोकपाल विधेयकामुळे निर्णयप्रक्रिया थंडावेल, असा सपचा आरोप चुकीचा आहे. उलट लोकपालमुळे कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाणारा नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला आपोआपच चाप लागेल. निवड समितीच्या शिफारशी स्वीकारल्याबद्दल जेटली यांनी सरकारचे अभिनंदन केले. खासगी निधी घेणाऱ्या संस्थांना लोकपालच्या कक्षेबाहेर ठेवण्याची निवड समितीची शिफारस सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे लोकपालवर अकारण ताण येणार नाही.
केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणाले की, गेल्या ४६ वर्षांपासून हे विधेयक प्रलंबित आहे. त्यात आजही सुधारणेला वाव आहे. मात्र देशवासीयांना भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा सकारात्मक संदेश लाकेपाल विधेयकामुळे जाईल. माकपचे सीताराम येच्युरी म्हणाले की, बडी उद्योगघराणी, परदेशातील भारतस्थित स्वयंसेवी संस्थांनादेखील अशाच कायद्याची गरज आहे. तृणमूल काँग्रेस, अन्नाद्रमुक, द्रमुक, बिजू जनता दलाने लोकपाल विधेयकाला पाठिंबा दिल्याने लोकपालचा मार्ग सुकर झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा