महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱयाचा रोजाचा उपवास मोडायला लावल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी लोकसभेमध्ये उमटले. विरोधी पक्षांनी शून्य काळात हा मुद्दा उपस्थित करीत शिवसेनेच्या खासदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेसह सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच भाजपचे रमेश विधुरी आणि एमआयएमचे असदुद्दिन ओवैसी हे अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धावून हमरीतुमरीवर आल्यामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावरच कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सुमित्रा महाजन यांनी शून्य काळात हा मुद्दा उपस्थित करण्याची सूचना केल्यावर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. शून्य काळात सुरुवातीलाच कॉंग्रेसने हा मुद्दा उपस्थित करीत महाराष्ट्र सदनात घडलेला प्रकार खेदजनक असल्याचे सांगितले. सर्व खासदारांनी आपले वर्तन आदर्श ठेवले पाहिजे, असे कॉंग्रेसच्या खासदारांनी सांगितले.
शिवसेना नेते अनंत गीते यांनी उत्तर देताना हा आरोप खोटा असल्याचे सांगितले. रमजानचा महिना पवित्र म्हणून ओळखला जातो. अशावेळी कोणीही असत्य बोलू नये, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

Story img Loader