उत्तर मुंबईतील भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना विजयाचा पूर्ण आत्मविश्वास असून निकाल जाहीर होण्याआधीच त्यांनी मिठाईची ऑर्डर दिली आहे. उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांची लढत काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या बरोबर आहे. अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.
निकाल जाहीर व्हायला अजून दोन दिवस बाकी आहेत. २३ मे रोजी निकाल जाहीर होईल. पण त्याआधीच विजयाची खात्री असल्याने शेट्टी यांनी मिठाईची ऑर्डर दिली आहे. विविध एक्झिट पोल्सनी भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवला आहे. उत्तर मुंबई भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. गोपाळ शेट्टी येथून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
बोरीवली येथील मिठाईच्या दुकानात गोपाळ शेट्टी यांनी मिठाईची ऑर्डर दिली असून इथल्या कारागिरांनी आतापासूनच विजयाचे लाडू वळण्याचे काम सुरु केले आहेत. गोपाळ शेट्टी यांच्याकडून आम्हाला १५०० ते २००० किलो मिठाईची ऑर्डर मिळाली आहे असे दुकानदाराने सांगितले. मिठाई बनवणारे कारागिर इतके उत्साहात आहेत की, ते मोदींच्या चेहऱ्याचा मास्क लावून मिठाई बनवत आहेत. २०१४ ला गोपाळ शेट्टी यांनी सर्वप्रथम उत्तर मुंबईतून निवडणूक जिंकली होती. काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा त्यांनी चार लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता.