प्रियंका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या असून त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्व संपुष्टात आलेल्या काँग्रेसला प्रियंका गांधींमुळे फायदा होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रियंका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्वांचलमध्ये फायदा होऊ शकतो, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. राजकारणातील त्यांच्या प्रवेशामुळे महाआघाडीचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार, प्रियंका फॅक्टरमुळे पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढू शकते. पण त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियंका गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारली. आता त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली असून पूर्व उत्तर प्रदेशमध्ये मृतप्राय झालेल्या काँग्रेसमध्ये जीव आणण्याचा प्रयत्न त्या करतील. खासगी वृत्त वाहिनीच्या सर्वेक्षणातून यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सद्वारे पूर्वांचलमधील ४३ जागांच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे सर्वच जागांवर काँगेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ दिसत आहे. पण त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता कमी दिसत आहे. यामध्ये काँग्रेसला ४, एनडीएला २० आणि महाआघाडीला १९ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

भाजपाला फटका नाही
सर्वेक्षणात पूर्वांचलमधील ४३ जागांवर प्रियंकाच्या प्रभावाबाबत जाणून घेण्यात आले. प्रियंकाच्या राजकारणातील प्रवेशानंतर उत्तर प्रदेशमधील चित्र किती बदलले आहे आणि काँग्रेसला किती जागांचा फायदा होईल हे जागानिहाय सर्वेक्षणात जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वेनुसार, प्रियंका गांधींच्या आगमनाने काँग्रेसच्या मतात वाढ होताना दिसत आहे. पण इतकीही वाढ नाही की, राज्यात काँग्रेसच्या जागा वाढतील. त्याचबरोबर काँग्रेसचा प्रतिस्पर्धी पक्ष भाजपाचे मोठे नुकसानही होणार नसल्याचे दिसत आहे. प्रियंकांमुळे काही जागांवर भाजपाच्या मतात घट होताना दिसत आहे. पण आधीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

प्रियंका यांच्यामुळे काँग्रेसच्या २ जागांमध्ये वाढ होईल. पूर्वांचलमध्ये अमेठी आणि रायबरेलीसह ४ जागांवर विजय मिळू शकतो. मात्र, यामुळे महाआघाडीचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. जुन्या सर्वेक्षणात महाआघाडीला २६ जागा मिळणार होते. आता त्यांना ७ जागांचे नुकसान सोसावे लागणार आहे. महाआघाडीला १९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. एनडीएला अजूनही ५ जागांचा फायदा दिसत आहे. प्रियंका यांच्या प्रवेशाआधी सर्वेक्षणात भाजपाला १५ जागा तर काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोनच जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2019 effect of priyanka gandhi on congress opinion poll