जो पक्ष आमच्या पाण्याची सोय करणार त्यालाच मतदान करु, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मतदार संघातील ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक पक्ष आणि नेते विकासाची आश्वासने देत आहेत. चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गावात पाण्याची भीषण परिस्थिती आहे.
खासदार हंसराज अहीर हे या मतदारसंघातून ४ वेळा खासदार झाले आहेत. मात्र येथील काही भागांतील पाण्याची समस्या अद्याप तशीच आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्याची समस्या गंभीरपणे पुढे आली आहे. येथे कधी दोन दिवसांनी, कधी चार दिवसांनी तर कधी चक्क महिन्याभरानंतर पाणी येते. गावाजवळ लाखो रूपये खर्च करून विहीर बांधली आहे. पण त्या विहिरीतून किती गावांना पाणी देणार ही मोठी समस्याच.
आर्णी तालुक्यातील एका गावातील महिला पाण्यासाठी दिवसभर भटकंती करत असल्याचे वास्तविक चित्र आहे. सकाळी उठल्यापासून फक्त त्यांना पाण्याची चिंता असते, आज पाणी मिळेल का? याच विचाराने त्यांच्या दिवसाची सुरूवात होते.
येथील एका महिलेने आपली व्यथा कॅमेऱ्यासमोर मांडली. ती म्हणाली, ‘हाताला काही काम नाही, त्यात गावांमध्ये पाणी नसल्यामुळे दिवसभर भटकंती करावी लागते. कधी डोंगरावरून पाणी आणावे लागते. तेही पुरेसं पाणी मिळत नाही. दिवसभर भटकंती केल्यामुळे पाय खूप दुखतात. मात्र, तहान भागवण्यासाठी दुसरा काही पर्यायही नाही.’
गाव सोडून कुठेतरी दुसऱ्या गावांत जावे असे वाटत असल्याची व्यथा दुसऱ्या एका महिलेने मांडली. तिचे बोलणं संपते ना संपते तोच इतर महिला म्हणाल्या की, पाण्यासाठी वणवण करावी लागते, कधीकधी पाणी येतं मात्र तेही गढूळ असते. जो पक्ष पाण्याची सोय करून देणार त्यांनाच आम्ही या निवडणुकीत मतदान करू, असा इशाराच या महिलांनी दिला आहे.
आज प्रत्येक पक्ष विकासाच्या घोषणा करतोय. शहरी भागात विकास पोहोचलाही आहे. मात्र, भारतातील अशा काही ग्रामीण भागातील लोकांच्या सर्वसामान्य गरजा पूर्ण झालेल्या दिसत नाही. येथील लोकांना पाणी आणि रोजगार हवा असतो. तोही मिळालेला दिसत नाही. सरकार कोणाचेही येऊ देत, स्थानिक खासदाराने अशा ग्रामीण भागातील लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करायला हव्यात.