गाडीवर लाऊड स्पीकर लावून, पक्षाचे झेंडे लावून प्रचार करण्याची पद्धत आपण नेहमीच पाहतो. पण गडचिरोलीतील दुर्गम भागातील खेड्यामध्ये अत्यंत सावधपणे प्रचार केला जातो. पक्षाचे झेंडे कोण घेऊन कोणी फिरत नाही ना गाडीवर लाऊड स्पीकर लावून घोषणा दिल्या जातात… आणि याचे एकमेव कारण म्हणजे नक्षल्यांची भीती.

एकीकडे नक्षलवाद्यांची भीती तर दुसरीकडे पोलिसांचाही धाक… त्यामुळे नक्षलग्रस्त भागांमधील लोक उघडपणे राजकीय मत व्यक्त करणे टाळतात. या भागांमध्ये प्रचार करणेही अवघड असते. बाहेरील व्यक्ती या गावांमध्ये प्रचारासाठी फिरकत नाही.

(आणखी वाचा : आचारसंहिता म्हणजे काय? )

गडचिरोलीतील भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा आणि धानोरा या नक्षलग्रस्त भागांचा समावेश होतो. एटापल्लीतील स्थानिकांशी संवाद साधला असता एकीकडे नक्षलवाद्यांची भीती आणि दुसरीकडे पोलीस अशा कात्रीत ते सापडल्याचे जाणवते. भामरागड, एटापल्ली येथील दुर्गम नक्षलग्रस्त भागात कसा प्रचार केला जातो अशी विचारणा केली असता एका तरुणाने उलगडा केला. तो सांगतो, नक्षलग्रस्त भागातील दुर्गम भागांमध्ये गाडीवर लाऊडस्पीकर किंवा पक्षाचा झेंडा लावून प्रचार केला जात नाही. स्थानिक कार्यकर्तेच ग्रामस्थांमध्ये अत्यंत सावधपणे प्रचार करतात. तर काँग्रेसमध्ये सक्रीय असलेल्या एका व्य़क्तीला विचारले असता तो म्हणतो, नक्षलग्रस्त भागातील दुर्गम खेड्यांमध्ये बाहेरील कार्यकर्ते किंवा नेते जात नाही. या भागात अजूनही कोणताच उमेदवार गेलेला नाही. पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्यावरच प्रचाराची धुरा आहे.

(आणखी वाचा : NOTA : ‘नोटा’ म्हणजे काय, मतदानावेळी का वापरला जातो हा पर्याय? )

सिंरोचा येथे परिस्थिती आणखी वेगळी आहे. येथील दुर्गम भागात उमेदवार कोण हे देखील माहित नसते. या भागातील मंडळी मतदानाच्या एक- दोन दिवस अगोदर गावात बैठक घेऊन मतदान कोणाला करायचे याचा निर्णय घेतात. नेते येतात आणि जातात.. पण शेवटी गावातील लोकांना तिथेच राहायचे आहे. म्हणून स्थानिक कार्यकर्ते प्रचार करताना सावध असतात, असे एका ग्रामस्थांने सांगितले.

Story img Loader