निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडे पाठिंबा मागितला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सलग ट्विट करत पुन्हा एकदा निवडून देण्याचे अपील केले. ‘सबका साथ, सबका विकास नीतीअंतर्गत काम करणाऱ्या एनडीएला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीची उजळणी करताना मोदी म्हणाले की, मागील ७० वर्षांत ज्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत त्या मागील ५ वर्षांत आम्ही पूर्ण केल्या. आता भारताला समृद्ध आणि सुरक्षित राष्ट्र करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान मोदींनी ‘फिर एक बार मोदी सरकार’ या हॅशटॅगसह ट्विट करत जनतेला आशीर्वाद मागितला आहे.

लोकांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे अपील करताना लोकशाहीचा उत्सव आल्याचे म्हटले आहे. देशवासियांनी निवडणुकीत सक्रिय झाले पाहिजे. मला या निवडणुकीत ऐतिहासिक मतदानाची अपेक्षा आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या कामगिरीबाबत बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदा देशात २.५ कोटी कुटुंबीयांना वीज उपलब्ध झाली आहे. ७ कोटी घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस गेला आहे. १.५ कोटी कुटुंबाला स्वत:चे मिळाले आहे.

आयुष्यमान योजनेबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, ५० कोटी लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. ४२ कोटी असंघटित क्षेत्रातील वृद्ध लोकांना वृद्धावस्था पेन्शन मिळाली आहे. १२ कोटी शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६००० रुपयांची मदत दिली जाणार आहे. कोट्यवधी लोकांना प्राप्तिकरात सूट दिली जाईल.

Story img Loader