लोकसभा मतमोजणीमध्ये, महाराष्ट्राच्या ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार चांगली कामगिरी करत आहेत. मात्र शिवसेनेचा हक्काचा गड मानला जाणाऱ्या चंद्रकांत खैरेंना चांगलाच धक्का बसलेला पहायला मिळतोय. अपक्ष उमेदवार आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या बंडखोरीमुळे खैरे मतमोजणीत तिसऱ्या जागेवर फेकले गेले आहेत.
अवश्य वाचा – आढळरावांच्या गडात अमोल कोल्हेंची कडवी टक्कर, पहिल्या फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी
औरंगाबाद हा शिवसेनेचा हक्काचा गड मानला जातो. गेली अनेक वर्ष चंद्रकांत खैरे या मतदारसंघात राजकारण करत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये खैरेंना बंडखोरीचं ग्रहण लागलेलं दिसतं आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई, हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष अर्ज भरत आपलं आव्हान निर्माण केलं. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे हर्षवर्धन जाधव यांना मराठा वर्गाचा चांगला पाठींबा मिळत होता. त्यातच दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांचा प्रचार केल्याचा आरोपही खैरे यांनी केला होता.
याचाच परिणाम मतमोजणीमध्ये पहायला मिळतो आहे. निश्चीत विजय मानला जाणाऱ्या औरंगाबादच्या जागेवर चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलिल आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात सध्या काटे की टक्कर सुरु आहे. जाधव आणि जलिल यांच्यात अवघ्या ६०० ते ७०० मतांचं अंतर आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कल कायम राखल्यास औरंगाबादच्या जागेवर धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.