Premium

होमहवन, कार्यकर्त्यांची गर्दी; मतदानापूर्वी असा होता गडकरींचा दिवस

मतदानाच्या पूर्वसंध्येला गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

होमहवन, कार्यकर्त्यांची गर्दी; मतदानापूर्वी असा होता गडकरींचा दिवस

नागपूरमधील रामनगर परिसरातील नितीन गडकरींचे निवासस्थान.. दुपारी दीडच्या सुमारासची वेळ… घरात हवन सुरु होते… मतदानाच्या पूर्वसंध्येला गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.. गडकरीही हसतमुखाने कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते.. प्रचारतोफा थंडावल्यानंतर गडकरींच्या निवासस्थानी बुधवारी असे चित्र होते.

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत असून विदर्भातील सात जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातील लढत लक्षवेधी आहे. काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात असल्याने ही लढत गडकरींसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरली आहे.  मंगळवारी अमित शाह यांच्या सभेने नागपूरमध्ये भाजपाने प्रचाराची सांगता झाली. बुधवारी सकाळी गडकरी नागपूरमध्येच होते. रामनगर परिसरातील भक्ती निवास या निवासस्थानी हवन आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते आणि स्थानिक नेते गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी येत होते. साहेब तुम्हीच जिंकणार, अशा शुभेच्छा ते देत होते.

तरुण कार्यकर्ते गडकरींसोबत सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात होते. तर नेतेमंडळीही गडकरींसोबत छायाचित्र काढण्यासाठी धावपळ करत होते. गडकरींचा रोकठोख स्वभाव बुधवारी सकाळीही दिसून आला. एक तरुण कार्यकर्ता सेल्फी काढत असताना गडकरी म्हणतात, माझा विजय व्हावा, असे वाटत असेल तर मला फोटो काढण्यात व्यस्त ठेवू नका. प्रत्येकाने निवडणुकीनंतरही काम करत रहा.

दलित, कुणबी आणि मुस्लीम मतदार काय भूमिका घेतात, यावर गडकरींचे भवितव्य अवलंबून आहे. या मतदारसंघात सुमारे २१ लाख मतदार असून गडकरींची मदार नवमतदारांवर आहे. नाना पटोले यांनी देखील पदयात्रा, रॅलीच्या माध्यमातून प्रचारावर भर दिल्याने भाजपासमोर आव्हान आहे. वंचित आघाडी आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार रिंगणात असले तरी ते फारसा प्रभाव पाडू शकणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे नागपूरमधील लढत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य गुरुवारीत मतपेटीत बंद होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksabha election situation at nitin gadkari home one day before lok sabha elections

First published on: 10-04-2019 at 17:29 IST

संबंधित बातम्या