रेश्मा शिवडेकर, मुंबई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची चित्रपट अभिनेत्री ही प्रतिमा, त्यांचा प्रचाराचा धडाका, त्यांना लाभलेली स्थानिक मनसे नेते आणि कार्यकर्त्यांची साथ यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील परीक्षेचा पेपर भाजपसाठी सोपा राहिलेला नाही.

उर्मिला मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तेथील प्रश्नांची त्यांना फारशी जाण नाही, मात्र लोकांमध्ये मिसळण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्या करतात. त्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आत्मविश्वासपूर्ण व्यक्त होतात. ‘छोटा गुजरात’ अशी ओळख असलेल्या भाजपच्या या बालेकिल्ल्यात एरवी मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराकडे पाहिलेही नसते, परंतु तुलनेत उर्मिला यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

उर्मिला यांची झुंज इथले नगरसेवक ते खासदार या प्रवासात एकही निवडणूक न हरलेले भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याशी आहे. त्यात उत्तर मुंबई भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला. इथले व्यापारी, मध्यमवर्गीयही भाजपच्या मागे वर्षांनुवर्षे उभे राहिले. म्हणून महाराष्ट्रात सर्वाधिक मतांची आघाडी घेऊन जिंकलेल्या शेट्टी यांच्यासाठी या निवडणुकीचा पेपर फारसा अवघड नव्हताच. म्हणूनच त्यांच्याविरुद्ध कुणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न काँग्रेसनेतृत्वापुढे होता. त्यावर ‘उर्मिला मातोंडकर’ हे उत्तर सापडल्याने इथल्या लढतीत रंग भरला आहे.

मराठी मते काँग्रेसकडे वळली तर आपला विजयाचा मार्ग सुकर होईल, असे उर्मिला यांचे गणित आहे. लाखभर मराठी मते जरी काँग्रेसच्या बाजूने आली तरी भाजपच्या २०१४च्या सुमारे साडेचार लाख मतांच्या आघाडीला शह कसा देणार, हा प्रश्न उरतोच. उर्मिला ‘मराठी मुलगी’ ही प्रतिमा इथल्या मराठीजनांमध्ये ठसवू पाहत आहेत. त्यांचे वडील सेवा दलाचे कार्यकर्ते असल्याने समाजवादी आणि डाव्या नेत्यांची साथ त्यांना मिळत आहे.  त्यांच्या उमेदवारीनंतर गोपाळ शेट्टी यांनाही आपण घरात मराठीच कसे बोलतो, मराठी संस्कृती, भाषा जपण्यासाठी कायकाय करतो, हे सांगावे लागले. थोडक्यात, उर्मिला यांच्या उमेदवारीमुळे ‘ऑप्शन’ला टाकलेल्या प्रश्नांचा सराव भाजपला सुरू करावा लागला यातच काय ते आले!

गोपाळ शेट्टी

बलस्थाने

* गुजराती, मारवाडी यांच्यासह इतर समाजांतील मध्यमवर्गाची एकगठ्ठा मते

* आमदार, नगरसेवक, सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचारात सक्रिय सहभाग

* नगरसेवक ते खासदार- कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून जाणीवपूर्व जपलेली ओळख

कच्चे दुवे

* उर्मिला मातोंडकर यांच्या निमित्ताने उभे ठाकलेले आव्हान

* मनसेची काँग्रेसला साथ

* बेधडक स्वभावामुळे काही समाज दुरावलेले

उर्मिला मातोंडकर

बलस्थाने

* बॉलीवूडमधील कामगिरीमुळे ओळखीचा चेहरा

* प्रश्न समजून घेऊन भाष्य करण्याची क्षमता

* स्थानिक मनसे नेत्यांचा-कार्यकर्त्यांचा प्रचारात सक्रिय सहभाग

कच्चे दुवे

* स्थानिक काँग्रेस नेत्यांमधील विसंवादाबरोबच कार्यकर्त्यांची वानवा

* मतदारसंघातील प्रश्नांची जाण नाही

* आयत्यावेळी उमेदवारी जाहीर झाल्याने शून्यातून सुरुवात

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2019 urmila matondkar gopal shetty mumbai north constituency