पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकलूजमधील सभेला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. याआधी त्यांचे पुत्र रणजिंतसिंह यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. अहमदनगरमध्ये सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा झाली. विरोधी पक्षनेतेपद असल्यानेच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोदी यांच्या सभेला जाण्याचे टाळले. पण सभा यशस्वी करण्याकरिता सारी शक्ती पणाला लावली. विखे-पाटील आणि मोहिते-पाटील यांच्या दुसऱ्या पिढीच्या भाजप प्रवेशाचीच सध्या चर्चा सुरू आहे. पण या दोन्ही घराण्यांमध्ये पक्षांतरे नवीन नाहीत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आधी शेकापमध्ये होते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेच्या राजकारणात ‘शेकाप’मधील काही नेत्यांना काँग्रेसमध्ये आणले. यात मोहिते-पाटील होते. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा प्रवास काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा झाला. त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी २००३मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून सोलापूर लोकसभा मतदारसंघात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला यांचा पराभव केला होता. यामुळेच मोहिते-पाटील घराण्याला भाजप नवा नाही. विखे-पाटील घराण्यातील बाळासाहेब विखे-पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. वडील आणि मुलगा या दोघांना केंद्र आणि राज्यात शिवसेनेने मंत्रिपद दिले होते. पुढे पिता-पुत्र दोघेही काँग्रेसमध्ये म्हणजे स्वगृही परतले. मोहिते-पाटील घराण्याचा प्रवास शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप असा झाला आहे, तर विखे-पाटील घराण्याचा प्रवास काँग्रेस-अपक्ष-शिवसेना-काँग्रेस-भाजप असा झाला आहे. दोन्ही घराण्यांसाठी पक्षांतरे नवी नाहीत.
विवाह सोहळे आणि उमेदवारांचा प्रचार
सध्या लग्नसराई आहे. जवळजवळ रोजच लग्नाचे मुहूर्त आहेत. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी हे विवाह सोहळे फायदेशीर ठरत आहेत. ऐन उन्हाळ्यात दुपारी प्रचार करणे उमेदवारांसाठी दिव्य असते. यातच मतदारही घराबाहेर पडत नाहीत. मग एखादा विवाह सोहळा असल्यास उमेदवार आवर्जून उपस्थित राहतात. शिर्डी मतदारसंघातील उमेदवारांनी सर्व विवाह सोहळ्यांना हजेरी लावण्यावर भर दिला आहे. कारण विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्यावर तीन-चार हजार जणांशी संपर्क साधणे शक्य होते. फुकट प्रचाराचे ठिकाण मिळते. खर्च काही येत नाही. परवानगी घ्यावी लागत नाही. आचारसंहितेची आडकाठी येत नाही. राजकीय नेत्यांची हजेरी लागल्याने पै-पाहुणेही खूश होतात.