Loksabha : वक्फच्या सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत विरोधी पक्षांनी तुफान राडा केला. ज्यामुळे लोकसभेचं कामकाज हे सुरुवातीला १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं तर त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत हे कामकाज स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत जेव्हा या विधेयकावरचा अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. संसदीय समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल सादर होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
लोकसभेचं कामकाज स्थगित झाल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांक गांधी यांचं आंदोलन
लोकसभेत जेव्हा कामकाज तहकूब करण्यात आलं त्यानंतर प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी जोरदार आंदोलन केलं. वक्फ सुधारणा विधेयक आणून भाजपाला तिरस्कार पसरवायचा आहे असा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे.
राज्यसभेत काय घडलं?
राज्यसभेत जेव्हा वक्फ सुधारणा विधेयकावर संसदीय समितीचा अहवाल सादर झाला तेव्हाही गदारोळ झाला. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हा आरोप केला आहे की या सुधारणा विधेयकात अनेक कमतरता आणि त्रुटी आहेत. सरकारने त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे.
लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ
राज्यसभेत वक्फवरुन प्रचंड गदारोळ झाल्यानंतही या संदर्भातला अहवाल भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडला. या दरम्यान विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. सभापती जगदीप धनकड यांनी गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केलं होतं. राज्यसभेत जसा राडा झाला तसाच तो लोकसभेतही झाला. ज्यानंतर हे विधेयक मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली. लोकसभेत विरोधकांचा गदारोळ इतका वाढला की लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित केलं.
ओम बिर्ला यांनी काय म्हटलं आहे?
प्रश्नोत्तराच्या काळात कुठलाही गदारोळ घालायचा नसतो. नव्याने निवडून आलेले खासदार प्रश्न उपस्थित करत असतात. त्यांच्यासमोर तुम्ही विरोधक म्हणून गदारोळाचा आदर्श घालून देत आहात का? तुम्ही योग प्रकारे विरोध दर्शवा मी तुमच्या पाठिशी उभा राहिन. पण आत्ता जे करत आहात त्यावरुन हेच दिसतं आहे की तुम्हाला सदनाचं कामकाज योग्य पद्धतीने चालू द्यायचं नाही. त्यामुळे मी सदनाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करतो आहे. असं म्हणत ओम बिर्ला यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.
नेमकं काय घडलं?
जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी शेम शेमच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आणि अभूतपूर्व असा गदारोळ घातला. त्यामुळे लोकसभेत जोरदार राडा झाल्याचं पाहण्यास मिळालं. आता दुपारी २ वाजता लोकसभेचं कामकाज सुरु होईल तेव्हा काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आेहे.