काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारपासून सुरु केलेल्या मध्य प्रदेश दौऱ्यातील पहिल्याच भाषणामध्ये मोदींवर निशाणा साधला होता. मोंदीसाठी शेतकरी नव्हे तर अनिल अंबानी, नीरव मोदीच ‘भाई’ अशी टिका त्यांनी यावेळी केली होती. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने फेसबुक आणि ट्विटवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये वाचकांनी राहुल गांधी यांची भूमिका पटत असून मोदींच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान असल्याचे मत नोंदवले आहे.
‘लोकसत्ता’ने फेसबुक पेज आणि ट्विटवर ‘पंतप्रधान मोदींच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा हा आरोप पटतोय का?’ हा प्रश्न आपल्या वाचकांना विचारला होता. या मतचाचणीमध्ये चार हजारहून अधिक लोकांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी सरासरी ६० टक्के वाचकांनी राहुल गांधीचे मत पटत असल्याचे सांगत ‘होय’ असे उत्तर दिले तर ४० टक्के वाचकांनी मोदींच्या पारड्यात मत टाकत मोदींच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान असल्याच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचे मत नोंदवले.
फेसबुकवर एकूण २ हजार ३०० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले त्यापैकी १ हजार ३०० हून अधिक लोकांनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे तर ९०० हून अधिक लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. या जनमत चाचणीच्या पोस्टवर अनेकांनी राहुल आणि मोदींच्या समर्थनात तसेच विरोधात कमेन्ट करुन आपली मतेही नोंदवली आहे.
तर ट्विटवरही या जनमत चाचणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून २ हजारहून अधिक ‘ट्विपल्स’ने आपले मत नोंदवले आहे. त्यापैकी ६१ टक्के वाचकांनी ‘होय’ असे उत्तर दिले आहे. म्हणजेच १ हजार २००हून अधिक लोकांनी मोदींविरोधात मत नोंदवले आहे. तर ८०० हून अधिक जणांनी मोदींच्या बाजूने मत नोंदवले आहे.
#LoksattaPoll:
पंतप्रधान मोदींच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा हा आरोप पटतोय का?— LoksattaLive (@LoksattaLive) October 16, 2018
मध्य प्रदेशमधील पहिल्याच भाषणात मोदींच्या ह्रदयात महिला आणि शोषित वर्गाला स्थान नाही. त्यांच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान आहे. मोदींसाठी मेहुल चोक्सी, नीरव मोदी, अनिल अंबानी, ललित मोदी हीच लोक ‘भाई’ आहेत. ते शेतकरी आणि कामगार वर्गाला कधीच ‘भाई’ म्हणत नाही, अशा शब्दात राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला होता.