भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आता कुटुंबासह दुसऱ्या देशात स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी यासाठी ब्रिटनची निवड केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. म्हणजेच अंबानींचे दुसरे घर आता लंडनमध्ये असेल. माहितीनुसार अंबानी कुटुंब लंडनला स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत. त्यांनी स्टोक पार्क, बकिंगहॅमशायर (Buckinghamshire), लंडन येथे ३०० एकरची मालमत्ता घेतली. जिथे ते कुटुंबासह स्थायिक होतील, अशी माहिती मिड-डे ने दिली आहे.
अंबानींच्या नवीन घरात ४९ बेडरूम आहेत. तसेच अत्याधुनिक उपचार सुविधाही उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा महाल नुकताच सेट करण्यात आला आहे. अहवालानुसार, लॉकडाऊन आणि साथीच्या काळात अंबानींच्या कुटुंबाने त्यांचा बहुतांश वेळ त्यांच्या मुंबईत असलेल्या होम अँटिलियामध्ये घालवला आहे. तेव्हाच अंबानी कुटुंबांच्या लक्षात आले की त्यांना घर म्हणण्यासाठी आणखी एक मालमत्ता आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी लंडनची मालमत्ता आपले मुख्य घर बनवण्याचा निर्णय घेतला आहे, जी या वर्षाच्या सुरुवातीला अंबानींनी ५९२ कोटी रुपयांना विकत घेतली होती.
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा
अंबानींच्या नवीन महालात ४९ बेडरुम आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि लक्झरी वस्तूंचा समावेश असेल. या दिवाळीसाठी हे कुटुंब त्यांच्या नवीन घरी गेले आहे. अंबानी कुटुंब सहसा अँटिलियामध्येच दिवाळी साजरी करत असतात. दिवाळी साजरी केल्यानंतर, अंबानी कुटुंब भारतात परतेल आणि पुढील वर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या लंडनच्या घरी परत जाईल, असे अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, कुटुंबाला एक मोकळी जागा हवी होती, जी त्यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबाने गेल्या वर्षी त्यांचे नवीन घर शोधण्यास सुरुवात केली आणि स्टॉक पार्क मॅन्शनचा करार अंतिम केल्यानंतर, ३०० एकर मालमत्तेचे सुधारित करण्याचे काम ऑगस्टमध्ये सुरू झाले.
मालमत्तेबद्दल एक मनोरंजक गोष्ट
या मालमत्तेबद्दल एक मनोरंजक गोष्ट देखील आहे. हे घर पूर्वी खासगी निवासस्थान होते. १९०८ नंतर त्याचे कंट्री क्लबमध्ये रूपांतर झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे जेम्स बाँड चित्रपटाचे शूटिंगही झाले होते. लक्झरी जीवनशैलीसाठी आवश्यक गोष्टींव्यतिरिक्त, अंबानी कुटुंबाच्या या नवीन मालमत्तेत एक मिनी हॉस्पिटल देखील असेल, ज्याची देखरेख ब्रिटीश डॉक्टर करतील. मात्र, कुटुंबीयांनी या वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.