तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल व जरा कुतुहल असेल तर तुम्ही आता संभाव्य परग्रहवासीयांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा संदेश पाठवू शकाल, त्यासाठीचा एक प्रकल्प आज सुरू करण्यात आला. हे संदेश थेट अवकाशात पाठवले जाणार आहेत. द लोन सिग्नल प्रोजेक्ट असे या प्रकल्पाचे नाव असून त्यात वैज्ञानिक, उद्योजक व व्यावसायिक सहभागी आहेत. परग्रहवासीयांना पृथ्वीवासियांच्या वतीने संदेश पाठवण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यात सामान्य लोकही संदेश पाठवू शकणार आहेत.
लोन सिग्नल प्रकल्पात लोकांनी पाठवलेले संदेश हे अंतराळातील एका विशिष्ट ठिकाणी पाठवले जाणार आहेत. ते गिलेझ ५२६ या तारका प्रणालीकडे पाठवले जाणार असून हा तारकासमूह १७.६ प्रकाशवर्षे दूर आहे. या लाल बटू ताऱ्याच्या भोवती एकही ग्रह अजून सापडलेला नाही, पण गिलेझ ५२६ ताऱ्याभोवती जर ग्रह असतील तर ते वसाहत योग्य असतील असे वैज्ञानिकांना वाटते, असे या प्रकल्पाचे वैज्ञानिक अधिकारी जेकब हक-मिश्रा यांनी सांगितले.  
ते व त्यांच्या पथकाने असे ठरवले आहे की, वेगवेगळ्या तारकाप्रणालीकडे संदेश पाठवायचे. सध्या आम्ही जवळच्या ताऱ्यांकडे हे संदेश पाठवणार आहोत असे लोन सिग्नल प्रकल्पाचे सहसंस्थापक पिअर फेबर यांनी सांगितले. हा प्रकल्प सुरू झाल्यावर जेम्सबर्ग अर्थ स्टेशनवरून संदेश गिलेझ ५२६ ताऱ्याच्या दिशेने पाठवले जातील. हे अर्थ स्टेशन १९६८ मध्ये मध्य कॅलिफोर्नियात उभारण्यात आले होते. लोन सिग्नल प्रकल्पात या स्टेशनचा अँटेना तीस वर्षांसाठी भाडय़ाने घेतला आहे, पण या प्रकल्पाचा विस्तारही केला जाऊ शकेल. जगात दूरचित्रवाणी लहरी, रेडिओ लहरी व इतर विद्युतचुंबकीय लहरी सतत प्रक्षेपित होत असतात पण त्या फार क्षीण असतात, तुलनेने लोन सिग्नल प्रकल्पातील संदेश लहरी या शक्तिशाली असतील. खगोलशास्त्रज्ञ मायकेल बुश्च यांनी विकसित केलेला संदेश पहिल्यांदा पाठवला जाईल, त्यात पृथ्वीचे विश्वातील स्थान सांगितले आहे. आवर्ती सारणीतील मूलद्रव्यांची माहिती दिली आहे. हायड्रोजन अणूची माहिती बायनरी कोडमध्ये दिली आहे. जर गिलेझ ५२६ ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर परग्रहवासी असतील व त्यांच्याकडे कॅलिफोर्नियातील अ‍ॅलेन टेलिस्कोप अ‍ॅरे सारखे उपकरण असेल तर त्यांना हा संदेश ग्रहण करून त्याची उकल करता येईल. या प्रयोगात कुणीही भाग घेऊ शकतो, त्यासाठीचे पोर्टल सुरू करण्यात येत आहे असे लोन सिग्नलचे मार्केटिंग अधिकारी अर्नेस्टो क्वालिझा यांनी सांगितले.

Story img Loader