एका प्रकरणातील विवाहीत महिलेने तिच्या पती विरोधात क्रौर्याचा आरोप केला होता. मात्र ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा वाद दाम्पत्याच्या शारिरीक सुखामध्ये वितुष्ट आल्याने निर्माण झाल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आणि ही याचिका फेटाळून लावली. या प्रकरणातील महिलेने याचिकेत असं म्हटलं होतं की तिच्या पतीने तिच्याकडे हुंडा मागितला, तिचं शोषण केलं आणि अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले. मात्र ही याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलं?

न्यायमूर्ती अनीशकुमार गुप्ता म्हणाले, FIR आणि पीडितेचा जबाब या दोन्हीचा बारकाईने अभ्यास केल्यावर हे लक्षात येतं की अत्याचार किंवा हल्ला झाला असेल तर तो हुंड्याच्या मागणीसाठी झालेला नाही. या प्रकरणात पतीची शारिरीक सुखाची इच्छा पत्नीने पूर्ण केली नाही म्हणून हे सगळं घडलं आहे. शरीर सुखाचा मुद्दा हा दोघांमध्ये होता. पतीला शरीर सुख देण्यासाठी पत्नी नाही म्हणत होती. त्यानंतर ज्या घटना घडल्या त्यातून पतीविरोधात तक्रार नोंदवण्यात आल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

पती लैंगिक गरज भागवण्यासाठी पत्नीकडेच शरीरसुखाची मागणी करणार-न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाने असंही म्हटलं आहे की “पती त्याची लैंगिक गरज भागवण्यासाठी पत्नीकडे शरीरसुखाची मागणी नाही करणार तर मग काय करणार? नैतिकदृष्ट्या तो त्याचा अधिकार आहे. पत्नीकडे त्याने शरीरसुखाची मागणी करायची नाही तर मग त्याने कुठे जायचं? ” असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे.

सदर प्रकरणातील जोडप्याचा विवाह २०१५ मध्ये झाला

सदर प्रकरणात जे जोडपं आहे त्यांचं लग्न २०१५ मध्ये झालं होतं. ज्यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबाने कथितरित्या महिलेकडे हुंडा मागितला. तसंच हुंडा देण्यास नकार दिल्यानंतर मारहाण करण्यात आली आणि क्रूरपणे पतीने माझ्याशी शारिरीक संबंध ठेवले असं पीडितेने म्हटलं होतं. या याचिकेत पीडितेने असंही म्हटलं होतं की तिचा पती दारु प्यायचा. तसंच त्याने अनैसर्गिक संबंधांची मागणी केली होती. तसंच आपला पती रोज पॉर्न फिल्म्स पाहतो आणि आपल्यासमोर विविस्त्र फिरतो, हस्तमैथुन करतो असा आरोप पीडितेने केला होता. तसंच मी जेव्हा या सगळ्यावरुन पतीला हटकलं तेव्हा त्याने माझा गळा दाबला होता असाही आरोप पीडितेने केला होता.

पत्नीने याचिकेत आणखी काय दावा केला?

यानंतर पत्नीने याचिकेत हा दावा केला की तिचा पती तिला सासरी सोडून सिंगापूरला निघून गेला. आठ महिन्यांनी जेव्हा आपण सिंगापूरला गेलो तेव्हा पुन्हा पतीने छळ केला. या प्रकरणातील महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४८९ अ, ३२३, ५०४, ५०६, ५०९ तसंच हुंडा प्रतिबंध कायदा १९६१ च्या कलम ३ आणि ४ यांच्या अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर सदर महिलेने हे आरोप स्पष्टपणे केले नव्हते. तसंच हुंडा मागितला हा आरोपही कुठल्याही पुराव्याच्या आधारे केला नव्हता. असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. Bar and Bench ने हे वृत्त दिलं आहे.