Uttar Pradesh Crime News: चोऱ्या, दरोडे किंवा मोठमोठ्या टोळ्यांचं चित्रपटातलं सादरीकरण हे वास्तवातील काही घटनांमधूनच प्रेरणा घेऊन तयार केलं जातं, असं म्हणतात. प्रत्यक्षात अशा काही घटना घडत असल्याचे दाखलेही दिले जातात. पण उत्तर प्रदेशमध्ये एखाद्या चित्रपटाच्या कथानकात शोभेल अशा नावाच्या गँगनं विवाहासाठी आतुरतेनं मुलगी शोधणाऱ्या पुरुषांना गंडा घालून पोबारा केल्याच्या काही घडना उघड झाल्या आहेत. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या टोळक्याला गजाआड केलं आहे. या गँगचं नाव आहे ‘लुटेरी दुल्हन’!
‘लुटेरी दुल्हन’ या नावाला सार्थ ठरवणारं काम या टोळक्याचं होतं. अर्थात, लुटून नेणारी नवरी नुकत्याच लग्न झालेल्या आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना फसवून पोबारा करायची. अशाच चार तक्रारी उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिसांचा तपासही चालू होता. हाती लागणारे धागेदोरे या टोळक्याचा पर्दाफाश करण्यासाठी पुरेसे नसायचे. त्यामुळे यांच्या मुसक्या आवळायच्या कशा? या पेचात पडलेल्या पोलिसांसाठी या टोळक्यानं फसवून जाळ्यात ओढलेल्या एका महिलेनं केलेली तक्रार पावलं उचलण्यासाठी पुरेशी ठरली.
‘लुटेरी दुल्हन’ गँगची मोडस ऑपरेंडी…
या टोळक्याची गुन्हा करण्याची पद्धत अर्थात मोडस ऑपरेंडी एकदम सरळ होती. आधी ते गरीब आणि गरजू अविवाहित महिलांना हेरायचे. त्यांना लग्नाचं आणि पैशांचं आमिष दाखवायचे. मग या महिलांना पुढे करून लग्नासाठी प्रचलित वय उलटून गेलेल्या पण विवाहोत्सुक तरुणांना हेरायचे. त्यानंतर नातेवाईकांचा आख्खा गोतावळाच आपल्या गँगमधून उभा करायचे. तरुणाच्या घरच्यांशी संवाद साधून लग्न ठरवलं जायचं.
इथपर्यंतच ही टोळी थांबायची नाही. दोघांचं रीतसर विधीवत लग्नही लागायचं. त्यानंतर सात दिवसांसाठी नवरी मुलगी माहेरी पाठवणीसाठी यायची. सोबत तिचे लग्नातले सगळे दागिनेही घेऊन यायची. पण नंतर कधीच सासरी परत जायची नाही! मुलाकडच्यांनी आपल्या सुनेचा शोध घेतला, तरी ही मुलगी सापडायची नाही. अशा प्रकारे अनेकांना या टोळीनं गंडा घातला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. आत्तापर्यंत या टोळीविरोधात चार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
चौघांना अटक, मोठ्या टोळीचा शोध!
दरम्यान, फसवून टोळीत सामील करून घेतलेल्या एका महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या टोळीतल्या चार जणांना जेरबंद केलं आहे. प्रदीप भारद्वाज (३२), आमिर हाफिझ (२५), संतोष (३५) आणि मालती देवी (५०) अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत. प्रदीप या गँगचा मास्टरमाईंड असून तो बुलंदशहरचा रहिवासी आहे तर इतर तिघेजण अलिगढचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२०१५ सालापासून ही गँग अशी फसवणुकीची कामं करत असून त्यांचा वावर प्रामुख्याने अलिगढ आणि बुलंदशहर या भागांमध्ये होता. “या टोळक्यानं आत्तापर्यंत नेमकं किती जणांना फसवलं आहे याची आकडेवारी आमच्याकडे नाही. पण आमच्याकडे उत्तर प्रदेशमधल्या चार ठिकाणी अशा प्रकारे यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. शिवाय प्रदीप आणि आमिर यांच्या पत्नीदेखील गँगच्या प्रमुख सदस्य असून त्यांना आधीच एका गुन्ह्यात अटक झाली आहे”, अशी माहितीही पोलिसांनी दिली.