शासकीय ओळखपत्रे तयार करून घेताना होणारे घोळ आणि त्यांच्या सुरस कथा भारतीयांसाठी नव्या नाहीत. पाकिस्तानी नागरिकाच्या शिधापत्रिकेपासून ते एकाच व्यक्तीच्या दोन-दोन पॅन कार्डापर्यंत अनेक शासकीय दस्तावेज भारतात तयार करून घेतले जातात. असेच काहीसे आधार ओळखपत्राबाबतही घडले आहे. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या साक्षात हनुमंत देवतेचेच आधार कार्ड तयार करण्यात आले आहे, मात्र या ‘कार्डावर हक्क सांगण्यासाठी अद्याप कोणी’ आलेले नाही, अशी शासकीय अधिकाऱ्यांची तक्रार आहे.
२०९४७०५१९५४११ या क्रमांकाचे आधारकार्ड कोणाही श्रद्धाळू व्यक्तीस ‘दुर्मीळ’ वाटावे असेच आहे. या कार्डावर हनुमानाचे छायाचित्र असून ‘पवन’ यांचा मुलगा असा तपशील त्यावर नमूद करण्यात आला आहे.
या कार्डावर हनुमंत देवतेचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि अंगठय़ाचे ठसेही देण्यात आले आहेत. मात्र ६ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथून पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेले हे ओळखपत्र नेमके ‘कोणाच्या हाती’ सुपूर्द करायचे असा प्रश्न येथील पोस्टमनना पडला आहे.
हीरालाल नावाच्या एका पोस्टमनने साक्षात हनुमान देवतेचे छायाचित्र असलेले हे आधार कार्ड पाहिले आणि त्यांना धक्काच बसला. त्यावर देण्यात आलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद असल्याचे आढळून आले. विकास नावाच्या कोणी व्यक्तीने हा वात्रटपणा केला असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले, अशी माहिती येथील पोस्टमास्तर गोबरज यांनी दिली.

Story img Loader