भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत, असं विधान भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा निर्माण होण्याची शक्यता आहे. एका ओडिया वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे यावरून विरोधकांनीही भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राहुल गांधींकडून माओवाद्यांच्या भाषेचा वापर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

या विधानावरून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संबित पात्रा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाप्रभू श्री जगन्नाथ हे साऱ्या विश्वाचे भगवान आहेत. अशा महाप्रभूंना एका व्यक्तीचा भक्त म्हणणे म्हणजे ईश्वराचा अपमान आहे. या विधानांमुळे जगभरातील जगन्नाथ भक्त आणि ओडिया लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. भगवान जगन्नाथ हे ओडिया अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यामुळे संबित पात्रा यांनी केले विधान निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

याशिवाय अरविंद केजरीवाल यांनीही या विधानावरून भाजपाला लक्ष्य केलं. भाजपाच्या या विधानाचा तीव्र निषेध करतो. हे लोक स्वतःला देवापेक्षा मोठे समजू लागले आहेत. देवाला मोदी भक्त म्हणणे हा देवाचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली. याबरोबर काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनीही सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत भाजपाला घेण्याचा प्रयत्न केला. हे प्रभू या लोकांना माफ करा, असे कॅप्शन देत त्यांनी संबित पात्र यांच्यावर टीका केली.

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओनंतर संबित पात्रा यांनी स्पष्टीकरण देत बोलण्याच्या ओघात अनावधानाने हे विधान झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी नवीन पटनायक यांच्या पोस्टला रिपोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली. आज पुरी येथे नरेंद्र मोदींच्या रोड शोला मिळालेल्या प्रतिसादानंतर मी अनेक माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी मी पंतप्रधान मोदी हे भगवान जगन्नाथ यांचे भक्त असल्याचे सांगितले. मात्र, एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना माझ्याकडून अनावधानाने उलटे बोलल्या गेले. पंतप्रधान मोदी हे भगवान जगन्नाथ यांचे भक्त म्हणण्याऐवजी मी भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त असं. बोलून गेलो. बोलण्याच्या ओघात हा संपूर्ण प्रकार घडला, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord jagannath is devotees of pm modi sambit patras statements spark new controversy spb