राम मंदिराचं आमंत्रण हे कधीपासून इतकं महत्त्वाचं झालं? बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश केल्यानंतर बाकी सगळे प्रश्नच संपले आहेत. राम मंदिर कुणाच्या बापाची मालमत्ता आहे का? आमंत्रणं कशाला पाठवत आहेत? राम काही कुणाच्या मालकीचा नाही. तो सगळ्यांचाच आहे. रामाला पर्सनल प्रॉपर्टी बनवली जात आहे. रामाचा सातबारा यांच्या नावावर आहे का? भगवान श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम राम, प्रभू रामचंद्र हे शब्द प्रत्येकाच्या मनात आहेत. आत्ता रामाचं मार्केटिंग सुरु आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तुम्ही कोण आम्हाला आमंत्रण देणारे? आम्ही यायचं की नाही हे तुम्ही कोण ठरवणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्हाला यायचं तेव्हा छातीठोकपणे येऊ

तुम्ही (भाजपा) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रोखणार, तुम्ही महात्मा फुलेंना मारण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही शाहू महाराजांच्या हत्येची सुपारी देणार, तुम्ही आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिकायला लावणार त्याच आंबेडकरांनी संविधान लिहून, मनुस्मृती जाळून स्त्रियांनाही सन्मानित केलं. वंचितांना पाण्यापासूनच दूर ठेवलं होतं ते पाणीही त्यांनी प्यायला लावलं. काळा राम मंदिरात आंदोलन केलं आणि ते मंदिर सगळ्यांसाठी खुलं केलं. त्यामुळे तुमच्या आमंत्रणाचा विचार करुन आम्ही येऊ असं वाटत असेल तर विसरुन जा. आम्हाला जेव्हा यायचं आहे तेव्हा आम्ही छातीठोकपणे येऊ, रामाचं दर्शन घेऊ असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच राम मंदिराचे मालक तुम्ही नाही आणि राम तुमचा नाही हे लक्षात ठेवा असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करा, कुणी अडवलंय?

तुम्हाला गाजावाजा करत राम मंदिराचं उद्घाटन करायचं आहे तर मग राष्ट्रपती आहेत ना. त्या महिला आहेत, दलित आहेत. त्यांना मानाचं पद दिलं गेलं आहे, त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. संसदेची नवी इमारत बांधली तेव्हा साधू संत आले, पण राष्ट्रपतींना किंवा कुठल्याही महिलेला प्रवेश दिला नाही. द्रौपदी मुर्मूंना तर आमंत्रणही नव्हतं. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या मान्यतेने होते. ही कोणती व्यवस्था तुम्ही आणता आहात? वर्णद्वेष, जातीभेद याला राजाश्रय देणार का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आम्हाला जायचं असेल तेव्हा आम्ही जाऊ असेल हिंमत तर आम्हाला अडवून दाखवा असंही आव्हाड म्हणाले आहेत.

जागावाटपावर काय म्हणाले आव्हाड?

संजय राऊत यांनी २३ जागा मागितल्या आहेत. कोण काय मागतंय त्यावर चर्चा करणार नाही. प्रत्येकाला तोंड आहे, डोकं आहे प्रत्येकजण आपल्या डोक्याने बोलतो आहे. आम्हाला शरद पवार जोपर्यंत यादी फायनल करुन देणार नाहीत तोपर्यंत काहीही बोलणार नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. लोकसभेच्या जागावाटपाच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, आम्ही तर जागा मागणार आहोतच. पण आमच्या जागा मागत असताना त्याची चर्चा बाहेर येणार नाही. कारण अशा गोष्टी बैठकीतच बोलायच्या असतात. वरिष्ठांशी बोलून सगळं अंतिम करायचं असतं असं माझं धोरण आहे. असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जानेवारीपासून राज्यातलं वातावरण बिघडवण्याची तयारी सुरु

शरद पवार आणि बच्चू कडूंची बैठक बंद दाराआड झाली. मी काय दाराच्या बाहेर उभा होतो का? त्यांच्यात काय बोलणं झालं ते मला माहीत नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जानेवारीपासून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खराब करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. या सगळ्याच्या मागे सत्ताधारी आहेत. सत्ताधारी कधी कुणाला मोठं करतील काय करतील ते सांगता येत नाही. त्यांची जमीन हलली आहे, त्यामुळे जाती जातींमध्ये धर्मांमध्ये ठिणगी पडली पाहिजे हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा, वंचितचा मोर्चा हे काही मला आश्चर्य वाटत नाही. असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord ram belongs to everyone you do not own it do not do marketing of it said jitendra awhad scj
Show comments