अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन करण्याची लगबग सुरू आहे. भाजपाकडून याबाबत जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३० डिसेंबर) अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्या रेल्वे जंक्शनचे उदघाटन केले. यादरम्यान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी मोठे विधान केले आहे. फारूख अब्दुल्ला यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या लोकांना शुभेच्छा दिल्या. भारतातील बंधुभाव कमी होत असून तो पुन्हा वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे. तसेच प्रभू राम हे केवळ हिंदूंचे नाही तर संपूर्ण विश्वाचे आहेत, असेही ते म्हणाले.
हे वाचा >> “बाळासाहेबांचं ते एक वाक्य…”, बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना फारूख अब्दुल्ला म्हणाले की, आता राम मंदिराचे उदघाटन होत आहे. मंदिर उभे करण्यासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे मी अभिनंदन व्यक्त करतो. तसेच मी हे सांगू इच्छितो की, प्रभू राम हे फक्त हिंदूंचे नाहीत तर ते विश्वातील प्रत्येकाचे आहेत. ते या विश्वातील प्रत्येक व्यक्तीचे श्रद्धास्थान आहेत. हे ग्रंथातदेखील लिहिले आहे.
फारूख अब्दुल्ला म्हणाले की, प्रभू रामाने आपल्याला बंधूभाव, प्रेम, न्याय आणि एकमेकांना सहकार्य करण्याचा संदेश दिलेला आहे. श्रीराम यांनी कुणाचाही जाती-धर्म न पाहता कमकुवत किंवा उपेक्षित असलेल्यांना मदत करण्याची, त्यांना पुढे आणण्याची भूमिका घेतली. त्यांनी एक वैश्विक संदेश आपल्याला दिला आहे. आता राम मंदिराचे उदघाटन होत आहे. यानिमित्ताने मी देशातील लोकांना सांगू इच्छितो की, आपल्या देशातील कमी होत असलेला बंधूभाव पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करूयात. मी भारतातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, बंधूभाव वाढविण्यासाठी पुढाकार घ्या.
हे वाचा >> राम मंदिर की बेरोजगारी? देशासमोरची महत्त्वाची समस्या कोणती? सॅम पित्रोदांचा सवाल
अयोध्येत राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. रामलल्लाच्या दोन मूर्ती असणार आहेत. यातल्या एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या माहितीनुसार छोट्या मंदिरात जी मूर्ती ठेवण्यात आली आहे त्या मूर्तीची आणि मोठ्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा एकत्रच होणार आहे. नवी मूर्ती गाभाऱ्यात ठेवली जाणार आहे. या मूर्तीला ‘अचल’ मूर्ती असं म्हटलं जाईल. तर जी छोटी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती असेल.