‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सव्र्हिसेस’ कंपनीने निवडणूक रोख्यांच्या योजनेतील सर्वाधिक रोखे खरेदी केले होते. त्याने राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्यांपैकी ९० टक्के रोखे पक्षांनी वटवले आहेत. ज्यादिवशी निवडणूक आयोगाने रोख्यांची माहिती जाहीर केली, तेव्हा एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सर्वाधिक, म्हणजे १,३६८ कोटींचे निवडणूक रोखे ‘फ्युचर गेम्स अँड हॉटेल सव्र्हिसेस’ या कंपनीने विकत घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर भाजपाला ही देणगी दिली गेली असावी, असा कयास बांधून टीका केली गेली. मात्र आता नव्या माहितीनुसार लॉटरी किंग सांतियागो मार्टिनने फक्त भाजपाच नाही तर इतरही पक्षांना देणगी दिल्याचे समोर आले आहे.
नव्या आकडेवारीनुसार लॉटरी किंगच्या देणग्यांचा सर्वाधिक लाभ द्रमुक (DMK) पक्षाला झाला असून त्यांना ४६६ कोटींची देणगी मिळाली. त्यानंतर तृणमूल काँग्रेस ४५३ कोटी, वायएसआर काँग्रेस १६७ कोटी आणि भाजपाला १५२ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. सर्वाधिक देणगीच्या तुलनेत भाजपा चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे.
मजूर ते ‘लॉटरी किंग’ सांतियागो मार्टिनचा अविश्वसनीय प्रवास
गुरुवारी स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांची ताजी आणि शेवटची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली. कुठलीही लपवाछपवी न करता निवडणूक रोख्यांचा सगळा तपशील सार्वजनिक करा, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर एसबीआय बँकेने सर्व आकडेवारी जाहीर केली होती. १२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ पर्यंत निवडणूक रोखे देणारे देणगीदार आणि देणगी स्वीकारणारे पक्ष यांच्यात दुवा असलेला अक्षरअंकिय क्रमाकांसह डेटा प्रसिद्ध करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला दिले होते.
‘लॉटरी किंग’ मार्टिन अनेक वर्षे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर होता. त्याच्या ‘फ्युचर गेम्स अँड हॉटेल सव्र्हिसेस’ने एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सर्वाधिक, म्हणजे १,३६८ कोटींचे निवडणूक रोखे विकत घेतले होते. तमिळनाडूत २००३ मध्ये लॉटरीवर बंदी घालण्यात आली होती, तरीही अनेकांना ‘मार्टिन लॉटरी’ हे नाव अजूनही आठवते. त्याच तमिळनाडूमधील द्रमुक पक्षाला सर्वाधिक देणगी मिळाल्याचे दिसत आहे.
SC ने फटकारल्यानंतर SBI वठणीवर! निवडणूक रोख्यांसंदर्भातील सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर
सर्वच राजकीय पक्षांना मार्टिनकडून देणगी
वरील चार पक्षांशिवाय फ्युचर गेमिंग कंपनीने काँग्रेसला ५७ कोटी, राष्ट्रीय जनता दलाला २४ कोटी, भारत राष्ट्र समितीला १६ कोटी, अण्णाद्रमुकला १५ कोटी, बिजू जनता दलाला १० कोटी आणि सिक्किम क्रांती मोर्चा पक्षाला सात कोटींची देणगी दिली आहे.