पीटीआय, नवी दिल्ली : संसद कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशावर सत्ताधारी पक्ष भाजपचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ मुद्रित केले जात असल्याच्या वृत्तामुळे काँग्रेसने भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. संसदेला एकतर्फी, पक्षपाती बनवल्याचा आरोप काँग्रेसने भाजपवर केला. राष्ट्रीय प्राणी वाघ किंवा राष्ट्रीय पक्षी मोर यांचा समावेश करण्याऐवजी ‘कमळ’च का मुद्रित केले जात आहे, असा सवाल लोकसभेतील काँग्रेसचे प्रतोद मणिकम टागोर यांनी केला.
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अंतर्गत परिपत्रकात म्हटले आहे की, मार्शल, सुरक्षा कर्मचारी व अधिकारी, चेंबर अटेन्डंट आणि वाहनचालक यांना संसदेच्या नव्या इमारतीतून कामकाज सुरू झाल्यावर नवा गणवेश घालावा लागेल. नोकरशहांचा बंदगळा कोट जाऊन त्यांना गर्द गुलाबी रंगाचे जाकीट घालावे लागेल. त्यावर फुलांचे नक्षीकाम असेल. येत्या १८ सप्टेंबरला, गणेश चतुर्थीपासून संसदेच्या नव्या इमारतीतून कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.
‘फक्त भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळच का? मोर किंवा वाघ का नाही? हे असे का?’ असा सवाल टागोर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना ‘एक्स’वरून विचारला आहे. संसद कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशांवर ‘कमळ’ मुद्रित असेल, असे वृत्त एका प्रसार माध्यमाने दिले आहे. हा निव्वळ सवंगपणा असल्याचे नमूद करून टागोर यांनी नमूद केले, की त्यांनी ‘जी-२०’च्या यजमानपदाच्या कारकीर्दीतही असेच केले. आता ‘राष्ट्रीय पुष्प’ असल्याची सबब पुढे करून भाजप पुन्हा तसेच करत आहे. संसदेवरही आता पक्षचिन्ह थोपवले जात आहे.