कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नलिन कुमार कतील यांनी केलेल्या एका विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी कर्नाटकच्या लोकांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रस्ते, नाले आणि इतर छोट्या मुद्द्यांऐवजी लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. मंगळुरुमधील ‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना नलिन कुमार कतील यांनी हे विधान केलं आहे. तुंबलेली गटारं आणि रस्त्यांऐवजी ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यांवर लोकांनी लक्ष्य देण्याची गरज आहे, असं नलिन कुमार कतील यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, येणाऱ्या निवडणुकींमध्ये मंगळुरु शहरातील महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘बूथ विजय अभियान’ नावाचं मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलेलं. यावेळेस नलिन कुमार कतील यांनी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) निर्बंध घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे लोकांचे जीव वाचवण्यास मदत झाली आहे, असंही कतील यांनी सांगितलं. अनेक हिंदी कार्यकर्त्यांची हत्या करण्याचा कट पीएफआयने रचल्याचा दावा कतील यांनी केला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, “तुम्ही लोकांनी आता रस्ते, गटारे, नाले आणि अन्य छोट्या गोष्टींबद्दल विचार किंवा चर्चा करता कामा नये. तुमच्या मुलांच्या आयुष्याशी संबंधित मुद्दे म्हणजेच लव्ह जिहादला थांबवायचं असेल तर आपल्याला भाजपाची (भाजपा सरकारची) गरज आहे,” असं विधान कतील यांनी केलं. कर्नाटक काँग्रेसने सोमवारी कतील यांच्या या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. “राज्याचा विकास, रोजगार आणि शिक्षण हे सर्वसाधारण मुद्दे आहेत. हे फार लज्जास्पद आहे की भाजपाने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विकासाबद्दलच्या चर्चा करु नये असं म्हटलं आहे. मुळातच भाजपाने विकास कमी केला आहे,” अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे.

पीएफआयवर बंदी घालण्याआधी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल सदृश्य परिस्थिती होती असं कतील यांनी म्हटलं आहे. आज पीएफआयवर बंदी घालण्यात आली नसती तर मंचावर भाजपाचे नेते मोनप्पा भंडारी, आमदार वेदव्यास कामथ आणि हरि कृष्ण बंटवाल (दक्षिण कन्नडचे नेते) आपल्यात नसते त्यांच्या केवळ फोटोंना हार घातलेलं दिसलं असतं, असं कतील यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love jihad a priority not small issues like roads drains karnataka bjp chief nalin kumar kateel scsg
Show comments