विहींप नेत्या साध्वी प्राची यांनी लव जिहाद प्रकरणावरुन आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. मदरशांमधून लव जिहादचा प्रसार केला जात असून यासाठी अरब देशांमधून पैसा येत असल्याचा दावा साध्वी प्राची यांनी केला. सरकारने अशा घटनांची चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगत लव जिहाद करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणीही साध्वी प्राची यांनी केली. लखनऊमधील एका कार्यक्रमात साध्वी प्राची बोलत होत्या. लव जिहाद प्रकरण गाजत असताना साध्वी प्राची यांनी केलेल्या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा गदारोळ माजला आहे.

लखनऊमधील एका कार्यक्रमात बोलत असताना साध्वी प्राची यांनी हे विधान केलं. अरब राष्ट्रांमधून येणाऱ्या पैश्यामुळे हा प्रकार वाढीस लागला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र जातीमधील मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी १० ते २५ लाखांचा निधी दिला जात असल्याचा दावा साध्वी प्राची यांनी केला. काही दिवसांपूर्वी मंदीरात नमाज पठनाचा एक प्रकार घडला होता. साध्वी प्राची यांनी हा प्रकार षडयंत्र असल्याचं सांगितलं. “देशात भाईचारा गँग सक्रिय आहे, त्यांना मी इतकच सांगू इच्छिते की देशात एकता कायम रहावी यासाठी मी लखनऊ ज्या मशिदीत हवन करु इच्छिते.”

साध्वीच्या या विधानावर आता देशातील संतांची सर्वात मोठी परिषद असलेल्या आखाडा परिषदेने वक्तव्य दिलं आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी साध्वी प्राची यांनी भडकाऊ वक्तव्य करणं टाळलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लव जिहाद वरुन सुरु झालेलं राजकारण नेमकं कुठल्या दिशेने जातंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader