गेल्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांच्याच आशीर्वादाने गुजरातचे मुख्यमंत्री आणि प्रखर हिंदूत्वाचे प्रतीक बनलेले नरेंद्र मोदी यांना आज त्यांच्याच तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीत नरेंद्र मोदी यांची भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच संतापलेल्या अडवाणींनी आपल्या राजीनाम्याने मोदींवर शरसंधान करून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी काँग्रेसशी दोन हात करण्यासाठी सज्ज होण्याऐवजी भाजपमध्येच अंतर्गत कलहाला तोंड फोडले आहे.
गोध्राकांडानंतर घडलेल्या गुजरात दंगलींनंतर नरेंद्र मोदीही अडवाणींच्या पावलावर पाऊल टाकून हिंदूत्वाचे प्रतीक बनले. त्यावेळी धर्मनिरपेक्ष शक्ती आणि भाजपमधील निधर्मी नेत्यांचा होत असलेला विरोध खोडून काढण्यासाठी अडवाणींनी मोदींना प्रोत्साहन दिले. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत वाजपेयी सरकारला अकल्पित पराभव पत्करावा लागला. त्याचे खापर मोदींवर फोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अडवाणींनी मोदींचा बचाव केला. पण २००९ साली पंतप्रधानपदाचे उमेदवार अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढलेली लोकसभा निवडणूक भाजप-रालोआने गमावल्यानंतर पुढच्या म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, अशी चर्चा सुरु झाली आणि अडवाणी-मोदी यांच्यातील हिंदूत्वावरून निर्माण झालेले सौख्य संपुष्टात येऊ लागले. गतवर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा सरशी झाल्यानंतर भाजपवर मोदींचे वर्चस्व वाढायला सुरुवात झाली आणि वयाच्या ८६ व्या वर्षी पंतप्रधानपदाचे स्वप्न अधुरेच राहणार या जाणीवेने अडवाणींचा मोदींशी दुरावा वाढू लागला.
मोदींना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद सोपविले जाताच अडवाणींनी राजीनाम्याचे अस्त्र उपसून भाजपमधील शीतयुद्धाला तोंड फोडले. अडवाणी आणि मोदी यांच्या विरोधभक्तीच्या या प्रदर्शनात त्यांचे विश्वासू सुषमा स्वराज, अनंतकुमार, शिवराजसिंह चौहान, एस. एस. अहलुवालिया, उमा भारती यांनी ‘तटस्थ’ राहून गोव्यात मोदींच्या बाजूने कौल दिला. अडवाणींचा विरोध होणार हे गृहित धरून गोव्यात मोदी समर्थकांनी अडवाणी आणि त्यांच्या समर्थकांची जाहीर शोभा करण्याची तयारी चालविली होती असे म्हटले जाते. त्यामुळेच अडवाणींनी गोव्याकडे फिरकण्याचे टाळले. पण त्यानंतरही ५० सदस्यांच्या ‘मोदी आर्मी’ने पृथ्वीराज रोडवरील अडवाणींच्या निवासस्थानापुढे उग्र निदर्शने करीत अडवाणींचा निषेध केला.
१९८४ साली लोकसभेवर दोन खासदार निवडून गेलेल्या भाजपचे १९९९ साली १८२ खासदारांपर्यंत संख्याबळ पोहोचविण्यात सिंहाचा वाटा असलेल्या अडवाणींना हा अपमान सहन करता आला नाही आणि त्यांनी मोदींचा उघडच निषेध करण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये आरपारच्या लढाई आरंभली.

Story img Loader