देशभरातील ५६ औष्णिक केंद्रांमधील कोळशाच्या साठय़ात मोठय़ा प्रमाणावर घट झाली असून तेथे एका आठवडय़ापेक्षाही कमी साठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रीय विद्युत प्राधिकरणाने  (‘सेण्ट्रल इलेक्ट्रिसिटी अ‍ॅथॉरिटी’) यासंबंधीची माहिती जाहीर केली असून त्यानुसार कोळशावर आधारित ऊर्जानिर्मिती केंद्रांमधील कोळशाच्या साठय़ात अत्यंत घसरण झाली असून त्या ठिकाणी एका आठवडय़ापेक्षाही कमी कालावधीसाठी पुरेल, एवढाच साठा शिल्लक असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
याखेरीज ११ ऊर्जाकेंद्रांवर तर काहीही साठा शिल्लक नाही. ५६ केंद्रांपैकी ३३ केंद्रांवर चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठी शिल्लक आहे. या ३३ केंद्रांपैकी १० केंद्रे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा आयोगाच्या अखत्यारीत आहेत.
 राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा आयोगाच्या अखत्यारीतील बहुतेक केंद्रांना या कालावधीत कोळशाचा अत्यंत कमी पुरवठा झाला असल्याचे मुख्य कारण देण्यात आले.
कोळसा मंत्रालयाने या सर्व परिस्थितीचा गेल्याच आठवडय़ात आढावा घेतला असून सरकार या अडचणीवर तोडगा काढेल, असे सांगण्यात आले. यंदाच्या आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून या प्रथम तिमाही ऊर्जा क्षेत्राकडे कोळशाचा साठा ८७ टक्के होता. मात्र, वाहतुकीच्या अडचणी तसेच रेल्वे वाघिणींची कमतरता यामुळे कोळशाच्या पुरवठय़ात घट आली, असे ऊर्जा आणि कोळसा विभागाचे मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
परिस्थिती सुधारेल
‘ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, भारत कुकिंग कोल लिमिटेड आणि सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड या कंपन्यांच्या कोळसा खाणींमधील कोळशाचे उत्पादन आता सणासुदींच्या दिवसांनंतरच सुधारेल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा