भारतात करोनाची तिसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या कमी झाली आहे. देशात मंगळवारी ३ हजार ९९३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या ६६२ दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. मे २०२० नंतर देशभरातील दैनंदिन रुग्णसंख्या इतकी कमी नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रालयाने याबद्दल माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशात ५ हजारांपेक्षा कमी रुग्ण नोंदवण्यात येत आहेत. सोमवारी देशात ४ हजार ३६२ रुग्ण आढळले होते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात सध्या ४९ हजार ९४८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या ५ लाख १५ हजार २१०वर पोहोचली आहे. तर सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९८.६८ टक्के आहे.
दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट ०.४६ टक्क्यांवर असून विकली पॉझिटिव्हीटी रेट हा ०.६८ टक्क्यांवर आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशभरात १७९.१३ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.