LPG Price in Maharashtra, 1 August 2022: मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅसच्या किमती गगनाला भीडत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस वितरक कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सोमवारपासून (१ ऑगस्ट २०२२) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट करण्यात आली आहे. मात्र, ही घट केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरवर आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार, आज व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ३६ रुपयांची कपात करण्यात आली आहे.
त्यामुळे आजपासून राजधानी दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १९७६ रुपये होणार आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू झाले आहेत. याआधी एका व्यावसायिक सिलिंडरसाठी २०१२ रुपये मोजावे लागत होते. ६ जुलै २०२२ रोजी एलपीजी गॅसच्या किमतीत ९ रुपयांची घट झाली होती. तर १ जुलै २०२२ रोजी व्यावसायिक सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाला होता.
गेल्या तीन महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत केलेली ही चौथी कपात आहे. १ जूनपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत काहीवेळा घट झाली आहे. जूनपासून व्यावसायिक सिलिंडर सुमारे ३७८ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर १९७६.५० रुपये इतका आहे. तर कोलकत्ता, मुंबई, चेन्नई येथे अनुक्रमे २०९५.५०, १९३६.५० आणि २१४१ रुपये इतका दर आहे.
हेही वाचा – Petrol-Diesel Price on 1 August 2022: जाणून घ्या, आजचा पेट्रोल-डिझेलचा दर
मात्र, आज घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला होता. देशात १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती कायम आहेत. एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असल्या तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या बाबतीत जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही. जुलैपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, दिल्लीत यावर्षी आतापर्यंत १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरच्या किमती चार वेळा वाढल्या आहेत.