देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आयोजित केली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडीतील पक्षांकडून केलं आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झाली असून ‘इंडिया’ आघाडीचे देशपातळीवरील नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहिले.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे. ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने २०० रुपयांनी गॅस सिलिंडरचा दर कमी केला. ‘इंडिया’ जसं जसं पुढे जाईल, तसं एक दिवस असा येईल, की केंद्र सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा- सत्तेत आणि विरोधातही राष्ट्रवादीला ठेवणं ही शरद पवारांची खेळी? फडणवीस म्हणाले, “त्यांची खासियत…”
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पहिल्या बैठकीत सांगितलं होतं की, मी विरोधीपक्ष असा शब्द मानत नाही. आम्ही आमच्या देशाची रक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. भारतमातेचं रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हुकूमशहा आणि जुमलेबाजीला आमचा विरोधात तर आहेच. संजय राऊत यांनी जसं म्हटलं की, आमची तिसरी बैठक होणार आहे. तोपर्यंतच गॅस सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी झाले.”
हेही वाचा- राष्ट्रवादीत खरंच फूट पडलीय का? किती आमदारांचा पाठिंबा? अजित पवारांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…
“कदाचित मला असं वाटतं की, ‘इंडिया’ जसं जसं पुढे जाईल, तसं एक दिवस असा येईल की, आजचं सरकार (मोदी सरकार) गॅस सिलिंडर मोफत देईल. कारण सध्या सरकारच गॅसवर आहे. त्यामुळे सिलिंडरचे भाव कमी केले असतील, तर मला त्यात काहीही आश्चर्य वाटत नाही. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली. आतापर्यंत त्यांना बहिणींची आठवण आली नव्हती. आता अचानक बहिणींची आठवण आली आणि रक्षाबंधनाची भेट दिली. मग गेल्या नऊ वर्षात रक्षाबंधन झाला नव्हता का? भाऊबीज साजरी झाली नव्हती का? यह पब्लिक है, सब जानती है! आता काहीही केलं तरी त्यांना वाचवणारं कुणीही नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलं.