महागाईच्या दणक्याने ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. कारण महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. ऑईल मार्केटिग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली असून त्याअंतर्गत १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलिंडर २०९ रुपयांनी महागला आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव आणि दसऱ्यासारखे सण आहेत. अशातच तेलाच्या किमती वाढवल्याने याचा सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे.
दरम्यान, २०९ रुपयांच्या वाढीनंतर नवी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,७३१.५० रुपये इतकी होणार आहे. गेल्या महिन्यात १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता एका महिन्यातच सिलिंडरच्या किमतीत २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आल्यानंतर याच १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची १,५२२ रुपयांमध्ये विक्री केली जात होती. आता यात २०९ रुपयांची वाढ झाल्यानंतर याच सिलिंडरसाठी १,७३१ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात या सिलिंडरची १,६३६ रुपयांमध्ये विक्री होईल, तर चेन्नईत याच सिलिंडरसाठी १,८९८ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किमत १,४८२ रुपयांवरून १,६८४ रुपये इतकी करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या Aditya-L1 बाबत मोठी अपडेट, ISRO चा दुसऱ्यांदा मोठा पराक्रम, एका महिन्यात ‘इतकं’ अंतर पार
केंद्र सरकारने ३० ऑगस्ट रोजी देशातील सामान्य जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देत १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत २०० रुपयांची कपात केली होती. त्याचबरोबर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत १५० ते १५७ (वेगवेगळ्या शहरांमध्ये) रुपयांची कपात केली होती. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ११०३ रुपयांवरून ९०३ रुपये इतकी कमी झाली. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किमत १६३५ रुपयांवरून १४८२ रुपये इतकी कमी झाली होती.