Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अनेकवेळा चकमकीच्या घटनाही घडल्या आहेत. सरकार देखील दहशतवाद्याच्या विरोधात कठोर पावलं उचलत आहे. या पार्श्वभूमीवर आज जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी एक मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून तीन सरकारी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक पोलीस हवालदार, एक वन विभागाचा कर्मचारी आणि एका शिक्षकाचा समावेश असल्याची ओळख पटली आहे. या तीन कर्मचाऱ्यांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्यावरून त्यांच्यावर बडतर्फ करण्यात आलं आहे. तीन कर्मचाऱ्यांपैकी एकाचं नाव फिरदौस अहमद भट असं असल्याची माहिती समोर आली आहे. तो सेवेत असताना एका दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचा आरोप आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

आज लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षा आढावा घेण्यात आला. यानंतर तीन तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली. या बैठकीत मनोज सिन्हा यांनी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना दहशतवादविरोधी कारवाया आणखी तीव्र करण्याचे आदेश देखील दिले. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याबद्दल ७० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, मनोज सिन्हा यांनी यावेळी असंही म्हटलं की, दहशतवादाचे समर्थन आणि वित्तपुरवठा करणाऱ्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागेल. प्रत्येक गुन्हेगार आणि दहशतवादाच्या समर्थकाला किंमत चुकवावी लागेल. दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे, असं मनोज सिन्हा यांनी म्हटलं.