Lucknow Crime : आज नवीन वर्षाची अर्थात २०२५ या नव्या वर्षाची मोठ्या उत्साहात जल्लोषात सुरुवात झाली आहे. सगळीकडे नव्या वर्षाचं जोरदार स्वागत केलं जात आहे. मात्र, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ शहर हत्याकांडाने हादरलं आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरातील एका हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये ४ बहि‍णी आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी २४ वर्षीय मुलाला अटक केलं आहे. दरम्यान, हे कौटुंबिक वादातून या पाच जणांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव अर्शद असं असल्याची माहिती सांगितली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं घटना कुठे आणि कशी घडली?

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका कुटुंबातील पाच सदस्य बुधवारी लखनऊ शहरातील नाका परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. या मृतांमध्ये ४९ वर्षीय एक महिला आणि तिच्या चार मुलींचा समावेश आहे. या महिलेचं नाव अस्मान असं आहे, तर अलिशिया (१९), रहमीन (१८), अक्ष (१६ )आणि आलिया (९) असं या घटनेतील चार मुलींचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : Crime News : धर्मांतराच्या संशयावरुन दोन आदिवासी महिलांना खांबाला बांधून मारहाण, चौघांना अटक; नेमकी कुठे घडली घटना?

या घटनेप्रकरणी पोलिसांनी अस्मानचा मुलगा अर्शद (२४) याला अटक केलं आहे. तसेच ही हत्या मुलगा अर्शदने कौटुंबिक वादातून केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. दरम्यान, एका कुटुंबातील हे सर्व सदस्य आग्रा येथून नवं वर्ष साजरं करण्याच्या निमित्ताने लखनऊमध्ये आले होते. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी एक खोली घेतली होती. त्यानंतर त्यांनी एकत्र मिळून नवं वर्ष साजरंही केलं. मात्र, त्यानंतर आई आणि चार बहि‍णी मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेत अर्शदसह त्याच्या वडिलांचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण ही घटना घडल्यानंतर अर्शदचे वडील फरार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. तसेच अर्शदला पोलिसांनी अटक केलं असून त्याची पुढील चौकशी सुरु आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आवश्यक ती सर्व कारवाई केली. तसेच या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला असून या घटनेतील पुरावे गोळा करण्यासाठी पथकाला पाचारण केलं आहे. या घटनेबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल. तसेच हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचीही पोलीस चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लखनऊच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, या घटनेतील काही पीडितांच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. याबाबत आता फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow crime 5 members of the same family were killed in a hotel in lucknow city the accused was arrested gkt