Law Student Theft Case : गर्लफ्रेंडचा हट्ट पूर्ण करण्यासाठी एका विद्यार्थ्याने चक्क चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक विद्यार्थी कायद्याचं शिक्षण (LAW) घेत होता. मात्र, त्याने आपल्या गर्लफ्रेंडचा हट्ट पूर्ण करण्यासाठी अनेक घरांमध्ये चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हा सर्व प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

लखनौमध्ये एक विद्यार्थी कायद्याचं (LAW) शिक्षण घेत होता. मात्र, त्याच्या गर्लफ्रेंडला महागड्या गोष्टी देऊन खूश करण्यासाठी या विद्यार्थ्याने अनेक घरांमध्ये चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अब्दुल हलीम असं आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील जौनपूरचा रहिवासी असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. हा सर्व प्रकार असा उघडकीस आला की, लखनौमधील गोमती नगर भागात काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या चोरीच्या घटनांचा तपास सुरु केला.

हेही वाचा : Communal Clash : डेहराडून रेल्वे स्टेशनवर प्रेमी युगुलाच्या भेटीनंतर दोन समाज भिडले; तुंबळ हाणामारीनंतर दगडफेक, पोलिसांकडून लाठीहल्ला

यामध्ये पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर अब्दुल नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतलं. तसेच अब्दुलच्या हालचालींचा मागोवा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी घेतला. त्यानंतर अब्दुल हलीमला पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांकडून अब्दुल हलीमची प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत त्याने सांगितलेल्या माहितीनंतर सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या गर्लफ्रेंला खूश करण्यासाठी आणि तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्याने दिली. एका आठवड्याच्या कालावधीत त्याने परिसरातील तीन घरांमध्ये चोरी केल्याची माहितीही सांगितली. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, अब्दुलने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, त्याच्या मैत्रिणीला मॉलमध्ये शॉपिंग करायला आवडतं. तसेच आयफोन खरेदी करणे, क्लबमध्ये जाणे आणि चित्रपट पाहायला आवडते. त्यामुळे आपल्या मैत्रिणीच्या या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपण चोरीकडे वळल्याचं त्यांने सांगितलं. दरम्यान, या घटनेची माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी केशव कुमार यांनी सांगितलं की, “कायद्याचा विद्यार्थी अब्दुल हलीमने आपल्या मैत्रिणीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली आहे. घरफोडी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. अब्दुल हलीम हा कायद्याचा अभ्यास करत असल्याचं त्याने सांगितलं.”