Lucknow Crime News: प्रियकराच्या अनैतिक इच्छेमुळं उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एका रिक्षा चालकाला नाहक जीव गमवावा लागला आहे. ॲड. आफताब अहमद याने प्रेयसीच्या वडिलांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती. पण मारेकऱ्यांनी चुकून मोहम्मद रिझवान या रिक्षाचालकाची हत्या केली. चुकून झालेल्या या हत्येचा तपास करताना पोलिसही चक्रावून गेले होते. १३ दिवस कसून तपास केल्यानंतर पोलिसांनी अखेर गुन्ह्याचा छडा लावला. सुरुवातीला हा गुन्हा सूडातून केला असावा, असे पोलिसांना वाटले. पण रिझवानचे कुणाशीही शत्रुत्व नव्हते. त्यामुळे तपासात अडचण येत होती. अखेर रविवारी (दि. १२ जानेवारी) पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना अटक केली.
३० डिसेंबर रोजी रिझवान नेहमीप्रमाणे रिक्षातून प्रवाशांना ने-आण करण्याचे काम करत होता. तेव्हा अचानक त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हत्येच्या तपासाचा काहीच सुगावा लागत नसल्यामुळं पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करून वेगवेगळ्या बाजूंनी तपास सुरू केला. त्यानंतर ॲड. आफताब अहमद पर्यंत पोलीस पोहोचले. आफताबची चौकशी केल्यानंतर त्यानेच हा संपूर्ण कट रचल्याचे समोर आलं.
प्रेमप्रकरणासाठी दिली सुपारी
ॲड. आफताब अहमदचं त्याच्या कनिष्ठ महिला वकिलावर प्रेम जडलं होतं. पण तिचं लग्न झाल्यानंतर ती दिल्लीला स्थायिक झाली. प्रेयसी दिल्लीला गेल्यामुळं आफताबला तिची भेट घेणं दुरापास्त झालं होतं. प्रेयसीचे वडील लखनऊच्या मक्कागंज येथे एकटेच राहत होते. आफताबनं विचार केला की, तिच्या वडिलांची हत्या केली तर ती लखनऊला परतेल आणि त्याला पुन्हा एकदा तिच्याशी प्रेमसंबंध ठेवता येऊ शकतील.
असा रचला कट
प्रेयसीच्या वडिलांना संपविण्याचा विचार केल्यानंतर आफताबने मोहम्मद यासीरला सुपारी दिली. हत्या करण्यासाठी दोन लाख रुपये आणि हत्यारही पुरविले. यासीरने या कटात कृष्णकांत नावाच्या आरोपीला सहभागी करून घेतलं. २९ डिसेंबर रोजी दोघांनी प्रेयसीचे वडील राहतात त्या ठिकाणची रेकी केली. ३० डिसेंबर रोजी ते मक्कागंज येथे आले असताना त्यांनी चुकून मोहम्मद रिझवानलाच गोळ्या घातल्या.
हे ही वाचा >> Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
रिझावानला मारल्यानंतर मारेकऱ्यांनी आपताबकडून सुपारीचे पैसे मागितले. पण चुकीच्या माणसाला मारल्यामुळे आफताबने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वादही झाला. १३ दिवसांनी पोलिसांनी दोन मारेकरी आणि कट रचणाऱ्या वकील आफताबला अटक केली आहे.