Cesarean : शस्त्रक्रियेचं नाव काढलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. त्यामुळे शस्त्रक्रिया कोणतीही असो ती गंभीरतेने घेण्याची गोष्ट आहे. मात्र, सी सेक्शन डिलीव्हरीच्यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेच्या पोटात सिझेरियन शस्त्रक्रियेवेळी कात्री राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तब्बल १७ वर्षांनी उघडकीस आला आहे. ही घटना लखनऊमध्ये घडली आहे.
नेमकं घटना काय घडली?
लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना १७ वर्षांनी उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सिझेरियन केल्यानंतर एका महिलेच्या पोटात कात्री राहिली. त्यानंतर १७ वर्षांनी हा प्रकार उघडकीस आला. एका महिलेने एका हॉस्पिटलमध्ये २८ फेब्रुवारी २००८ रोजी एका बाळाला जन्म दिला होता. मात्र, यावेळी त्या महिलेची सी सेक्शन डिलीव्हरी झाली होती. दरम्यान, या महिलेचे पती अरविंद कुमार पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीची जेव्हापासून सिझेरियन शस्त्रक्रिया झाली तेव्हापासून पत्नीला सतत पोटदुखीचा त्रास होत होता.
त्यानंतर विविध हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांची भेट घेत उपचार घेतले. मात्र, तरीही तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही. यानंतर त्यांनी लखनऊमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये पत्नीच्या पोटाचा एक्स-रे करण्याचा निर्णय घेतला. यानंतर एक्स-रे काढल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. एक्स-रेमध्ये पत्नीच्या पोटात कात्री असल्याचं दिसून आलं. यानंतर तातडीने त्या महिलेला पुढील उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर त्या महिलेवर २६ मार्च रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पोटातील कात्री काढण्यात आली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
केजीएमयूचे प्रवक्ते सुधीर सिंग यांनी या घटनेची पुष्टी केली आणि सांगितलं की, “एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर पोटातील कात्री यशस्वीरित्या काढण्यात आली आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आलं आहे.” दरम्यान, पतीच्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीची सुरुवातीची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना निष्काळजीपणासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.