लष्कराच्या छावणीची भिंत कोसळून ९ जण जागीच ठार झाल्यायची धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, भिंत कोसळल्यानंतर मलब्याखालून एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. मुसळधार पावसामुळे लष्करी छावणीच्या सीमेवरची ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बांधकाम मजूर होते, असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर ३ वाजता लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले. लखनऊच्या दिलकुशा भागात ही लष्करी छावणी आहे. काही बांधकाम मजूर छावणीच्या भिंतीला लागून झोपड्यांमध्ये राहात होते. पावसामुळे ही भिंत थेट या झोपड्यांवरच कोसळल्यामुळे ही दुर्घटना झाली. जवानांनी ९ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, लखनऊमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. या पार्श्वभूमीवर लखनऊमधील शाळांमधल्या बारावीपर्यंतच्या वर्गांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow rain updat army enclave wall collapsed 9 people dead on the spot pmw