पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टी सातत्याने आरोप करत आहे की, भारतीय जनता पार्टी आगमी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच लुधियाना पोलिसांनी आप आमदार राजिंदरपाल कौर छीना यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, भाजपा आपचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. दी इंडियन एक्सप्रेसने याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरच्या हवाल्याने वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, आमदार राजिंदरपाल कौर छीना यांना आम आदमी पार्टी सोडून भाजपात प्रवेश करण्यासाठी भाजपाने पाच कोटी रुपयांची ऑफर दिली होती. तसेच दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घडवून आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचबरोबर लोकसभेचं तिकीट देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं.
लुधियाना पोलिसांमधील सूत्रांनी सांगितलं की, आमदार छीना यांनी काही फोन नंबर पोलिसांना दिले आहेत. यावरून त्यांना ऑफर देणारे कॉल्स येत होते. हे कॉल स्वीडनहून येत होते. फोन करणाऱ्या भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नावंदेखील छीना यांनी पोलिसांना दिली आहेत. यापैकी सेवक सिंह नावाच्या माणसाने अनेकदा कॉल केले होते असं छीना यांनी सांगितलं. या सेवक सिंहने छीना यांना सांगितलं होतं की, तो दिल्ली भाजपाचा कार्यकर्ता आहे.
लुधियाना पोलिसांनी आमदार राजिंदरपाल कौर छीना यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून त्याचं शीर्षक “भाजपाचा एक प्रतिनिधी सेवक सिंह याने दिल्लीहून आम आदमी पार्टीच्या लुधियाना दक्षिणच्या विद्यमान आमदार राजिंदरपाल कौर छीना यांना फोन केले, त्यांना पक्ष सोडण्यासाठी धमकावलं, पैशाचं अमिष दाखवून भाजपात सहभागी होण्याची ऑफर दिली” असं आहे.
या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, आमदार राजिंदरपाल कौर छीना यांना एक फोन आला. फोन करणारी व्यक्ती म्हणाली, मी भाजपाच्या दिल्ली कार्यालयातला एक कार्यकर्ता असून माझं नाव सेवक सिंह असं आहे. या सेवक सिंहने छीना यांना आम आदमी पार्टी सोडून भाजपात सामील होण्यासाठी ५ कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच लोकसभेचं तिकीट देऊ अथवा केंद्रात एखादं वरिष्ठ पद देण्याचं अमिष दाखवलं होतं. यासह छीना यांची दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घडवून आणण्याचं आश्वासनही दिलं होतं. छीना यांना स्वीडन, जर्मनी आणि इतर देशांमधून फोन येत होते.