गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइजिन्हो फेलेरो यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत आमदारकीचा राजीनामा दिला आणि थेट सोनिया गांधींना पत्र लिहिलंय. यात त्यांनी गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असूनही काँग्रेसचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही याला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केलाय. यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडालीय. आपल्या पत्रात फेलेरो यांनी गोवा काँग्रेसच्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत काँग्रसचा अंतर्गत कलह समोर आणला आहे.

लुइजिन्हो फेलेरो म्हणाले, “गोव्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले. काँग्रेसकडे बहुमतासाठी आवश्यक २१ आमदारांचा पाठिंबा होता. मात्र, यानंतरही काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी मला राज्यपालांकडे जाण्यापासून रोखलं.”

” काँग्रेसकडे बहुमताचा आकडा असूनही दिग्विजय सिंह यांनी राज्यपालांकडे जाऊ दिलं नाही”

“२०१७ मध्ये काँग्रेसचे १७ आमदार जिंकले. याशिवाय एक अपक्ष आमदारासह एकूण ४ आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा होता. त्यामुळे काँग्रेसकडे बहुमताचा आकडा असूनही दिग्विजय सिंह यांनी मला राज्यपालांकडे जाण्यापासून अडवलं. तसेच आणखी ४ आमदारांच्या पाठिंब्यासाठी वाट पाहायला लावलं,” असंही फेलेरो यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं.

” साडेचार वर्षात काँग्रेसची संख्या १८ आमदारांवरुन ५ वर, १३ आमदार भाजपात”

आपल्या राजीनाम्याचं कारण सांगताना फेलेरो म्हणाले, “काँग्रेससाठी मी गोव्यात लढाई लढलो. मात्र, आता ते शिल्लक नाही. मागील साडेचार वर्षात काँग्रेसची संख्या १८ आमदारांवरुन ५ वर आलीय. १३ आमदारांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय. मात्र, याला जबाबदार लोकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. गोव्यात काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करु शकले नाही. निवडणुकीनंतरच्या या घटनाक्रमाने मला स्वतःची फसवणूक झाल्यासारखं वाटत होतं.”

“पक्षाची पडझड रोखण्यासाठी कोणतीही आशा दिसत नाही”; माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यानंतर सोनिया गांधींना लिहिले पत्र

Story img Loader