उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एका कबड्डी स्पर्धेदरम्यान खेळाडूंना शौचालयात जेवण दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून काँग्रेससह विरोधी पक्षाने यावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
१६ सप्टेंबर रोजी सहारपूर येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियमवर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळाडूंना दुपारच्या जेवणात अर्धवट शिजवलेला भात जेवणासाठी देण्यात आला. तसेच जेवणाची व्यवस्था शौचालयात करण्यात आली होती. यावेळी शौचालयाच्या फरशीवर चरपात्या ठेवण्यात आल्याचेही उघड झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांनी स्पष्टीकरण दिले आहे. स्टेडियममध्ये बांधकाम सुरू होते. त्यामुळे दुसरीकडे अन्न तयार केले जात होते. तसेच पावसामुळे शौचालयात अन्नपदार्थ ठेवण्यात आले होते, असे ते म्हणाले.
काँग्रेससह विरोधीपक्षांची भाजपावर टीका
याप्रकरणावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका केली आहे. ”उत्तर प्रदेशातील कबड्डी खेळणाऱ्या मुलींना शौचालयात जेवण देण्यात आले आहे. खोट्या प्रचारावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या भाजपा सरकारकडे आपल्या खेळाडूंसाठी चांगली व्यवस्था करायला पैसे नाहीत”, असे ट्वीट काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत सिंह यांनीही यावरून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ”हा खेळाडूंचा घोर अपमान आहे. सत्ता उपभोगणाऱ्यांना फक्त आपली सोय करायची. बाकी सर्वांनी आत्मनिर्भर व्हावे”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.