आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवर योग्यवेळी बोलेन, एवढीच सावध प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिली. 
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ बुधवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीवर विचारण्यात आलेल्या कोणत्याही प्रश्नाला धोनीने स्पष्टपणे उत्तरे दिली नाहीत. काही खेळाडू मानिसकदृष्ट्या कमकुवत आहेत, एवढीच टिप्पणी एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने केली. यासंदर्भातील बाकीच्या प्रश्नांवर त्याने योग्यवेळी बोलेन, इतकेच सांगितले.
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱयांनीही केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित प्रश्नांनाच उत्तरे देण्यात येतील, हे स्पष्ट केले होते. त्यामुळे स्पॉट फिक्सिंगशी संबंधित प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्यांना रोखण्यात येत होते. इंग्लंडला जाण्यापूर्वी भारतात झालेल्या पत्रकार परिषदेतही धोनीने स्पॉट फिक्सिंगवरील कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिले नव्हते.

Story img Loader