शिवराज यादव, माढा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्महत्या करण्याची वेेळ आली आहे, पण धीट असल्याने करणार नाही असा संताप माढ्यामधील शेतकरी अर्जून व्यवहारे यांनी व्यक्त केला आहे. शेतकरी मरत असतात, आणि हे आपले गादीवरच अशा शब्दांत त्यांनी सरकारप्रती रोष व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांच्या तोंडी एक नाव नेहमी असतं ते म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ वैगेरे अशा अनेक घोषणा होत असतात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत काही मदत पोहोचली का हे पाहण्याची तसदी कोणताही पक्ष घेताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

अर्जून व्यवहारे आपल्या दीड एकर शेतात काकडीचं पीक घेतात. यासाठी त्यांना एकूण १० हजार रुपये खर्च करावे लागतात. याशिवाय शेतात काम करणाऱ्या महिलांना २०० रुपये रोजगार द्यावा लागतो. पण बाजारात काकडी विकण्यासाठी गेले असता त्यांना फक्त पाच रुपये किलो भावाने काकडी विकावी लागत आहे. काकडीचं पीक घेण्यासाठी १० हजार रुपये खर्च केल्यानंतर नफा तर राहिला बाजूलाच त्यांना स्वत:च्या खिशातूनच वेगळे पैसे घालावे लागत आहेत. त्यांच्या हाती फक्त तीन हजार रुपये येतात.

आपलं हे दुख: बोलून दाखवताना या जगाच्या पाठीवर शेतकऱ्याइतके वाईट हाल कोणाचेच नाहीत सध्या असं त्यांनी सांगितलं. आम्ही आलो ते आलो पण कोणीही चुकूनही शेतकऱ्याच्या जन्माला येऊ नये असं सांगताना त्यांचा संताप अनावर होत होता. वांगी. टोमॅटो, मिरची कशालाच भाव मिळत नाही. कोथिंबीरला भाव मिळाला की दोन दिवसांत पडतो असं ते सांगतात.

शेतीत करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आणि सरकार नुसत्या घोषणाबाजी करतंय. मिळत तर काहीच नाही. कोणतंच अनुदान मिळत नाही. पैसे तर मिळत नाहीतच पण पदरचेच जातात असं सांगताना नाइलाज आहे म्हणून शेती करावी लागते असंही ते म्हणतात.

पाच वर्षात शेतकऱ्याच्या हाती काहीच लागलेलं नाही. नोकरदार, उद्योगपती सर्वांसाठी सुरु आहे पण शेतकऱ्यांसाठी काही नाही असा आरोप यावेळी त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळेच सुरु आहेत. माझी परिस्थितीही आत्महत्या करण्याची, पण धीट असल्याने करणार नाही अशी हतबलता यावेळी त्यांनी व्यक्त केली.

या सगळ्यासाठी शासनच जबाबदार आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारने तोडगा काढला तर शेतकरी आत्महत्या कशाला करतील. शेतकरी जगेल यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे, पण सरकारकडे काहीच धोरण नाही. शेतकऱ्याचा कोणीही विचार करत नाही अशी खंत अर्जून व्यवहारे यांनी बोलून दाखवली.

निवडणुकीपुरता शेतकरी हवा असतो. परत त्याचा विचारच केला जात नाही. पाच वर्षात आठ दिवस तेवढं वारं, नंतर शेतकरी मरतात आणि हे आपले गादीवर अशी टीका यावेळी त्यांनी केली.