भारताच्या माजी राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता यांना शनिवारी (१९ मे ) दिल्लीच्या एका न्यायालयाने ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. माधुरी गुप्ता परराष्ट्र सेवेमध्ये असताना पाकिस्तानच्या भारतीय दूतावासामध्ये बसून पाकसाठी काम करीत होत्या, असे उघडकीस आले आहे. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आल्याची माहिती आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिद्धार्थ शर्मा यांच्या खंडपिठाने ६१ वर्षांच्या माधुरी गुप्ता यांना शुक्रवारी दोषी ठरवलं. माधुरीवर विश्वासाला तडा पोहोचवणे, गुन्ह्याचा कट रचणे असे आरोप लावण्यात आले आहेत. माधुरी गुप्ता यांना सरकारी गोपनियता अधिनियम कायद्याच्या कलम ३ आणि ५ अंतर्गत दोषी ठरवलं. यामध्ये कमाल ३ वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. 22 मार्च 2012 पासून माधुरी यांच्याविरोधात हा खटला सुरू होता.
जुलै २०१० मध्ये माधुरी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. आरोपपत्रात, माधुरी इस्लामाबादमधून लॅपटॉप आणि ब्लॅकबेरी फोनच्या माध्यमातून गोपनीय माहिती आयएसआयला पाठवत होत्या असं म्हटलं होतं. आयएसआयचे दोन अधिकारी मुबशर राजा राणा आणि जमशेद यांच्याशी माधुरी या संपर्कात होत्या, इतकंच नाही तर जमशेद सोबत त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते असंही आरोपपत्रात म्हटलं होतं. २२ एप्रिल २०१० रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. माधुरी गुप्ता १९८३ साली परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या, तेव्हा त्यांची पहिली नेमणूक क्वालालंपूर येथे झाली होती . त्यानंतर त्या बगदादमध्ये होत्या.