Madhya Pradesh News : मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. एका कंटेनरमधून १२ कोटी रुपयांच्या किमतीचे तब्बल १ हजार ६०० आयफोन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. हा कंटेनर चेन्नईला जात असताना ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून पोलीस महानिरीक्षकांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, ॲपल कंपनीचे मोबाईल घेऊन एक कंटेनर दिल्लीवरून चेन्नईकडे जात होते. या कंटेनरमध्ये चालक आणि सुरक्षा रक्षक असे दोघे होते. मात्र, कंटेनर लखनादोन या ठिकाणी आल्यानंतर सुरक्षा रक्षकाने एका तरुणाला बोलावून घेत कंटेनरमध्ये बसवलं. पुढे मध्य प्रदेशच्या नरसिंगपूरच्या आसपास चालकाला झोप आल्यामुळे कंटेनर उभं करत चालक झोपी गेला. चालक झोपल्यानंतर त्याचे हातपाय बांधत कंटेनरमधील मोबाईल गायब करण्यात आल्याचं चालकाने सांगितलं. यानंतर चालकाने पोलिसांत धाव घेतली. कंटेनरच्या गेटची कडी कापून आतमध्ये ठेवलेले मोबाईल घेऊन आरोपी पळून गेल्याचा दावा चालकाने केला आहे. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.
पोलीस महानिरीक्षक काय म्हणाले?
पोलीस महानिरीक्षक प्रमोद वर्मा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, “१२ कोटी रुपयांच्या किंमतीचे जवळपास १ हजार ६०० आयफोन लुटले गेले आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली. यासंदर्भातील तपास करण्यासाठी आम्ही तीन पथके तयार केली असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. या प्रकरणामध्ये कंटेनरबरोबर सुरक्षा रक्षक असलेला एकजण या प्रकरणात सहभागी असून त्याने त्याच्या काही काही साथीदारांना बोलावून कंटेनरच्या चालकाला वेठीस धरत ही चोरी केल्याची प्राथमिक माहिती आहे”, असं त्यांनी सांगितलं.
थेट आयजींनी घेतली दखल
मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एका कंटेनरमधून १२ कोटी रुपयांचे १ हजार ६०० आयफोन चोरीला गेल्याच्या घटनेनंतर संबंधित कंटेनर चालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. ट्रक चालक गुन्हा दाखल करण्यासाठी काही दिवस पोलीस ठाण्यात चक्रा मारत होता. पण तरीही गुन्हा दाखल न झाल्याने अखेर या घटनेची दखल थेट पोलीस महानिरीक्षक प्रमोद वर्मा यांनी घेतली आणि ते स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचले. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.