भाजपाला धोबीपछाड देत काँग्रेसने तीन राज्यातली सत्ता काबीज केली. मात्र आता खलबतं आणि चर्चा होत आहेत त्या मुख्यमंत्रीपदावरून. मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? तसंच राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर चर्चा आणि बैठकांचं गुऱ्हाळ सुरुच आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या निर्णयामुळे ज्योतिरादित्य सिंधियांचे कार्यकर्ते नाराज आहे असेही समजते आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं जावं अशी मध्यप्रदेशातील त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरून एक कमलनाथ यांच्या कार्यकर्त्यांचा गट तर दुसरा ज्योतिरादित्य सिंधियांच्या कार्यकर्त्यांचा गट असे दोन गट पडले आहेत. भोपाळमधल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे कार्यकर्त्यांना समजेल असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ हे दोन्ही नेते भोपाळला रवाना झाले आहेत. आता तिथे काय फैसला होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. आम्ही मध्य प्रदेशच्या जनतेसाठी इथे जातो आहोत. ही बैठक कोणत्याही शर्यतीसंदर्भात किंवा खुर्चीसाठी नाही असेही सिंधिया यांनी म्हटले आहे. तर बैठकीनंतर मुख्यमंत्री कोण याची घोषणा होईल असे कमलनाथ यांनी भोपाळला जाण्यापूर्वी स्पष्ट केले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर होत नाही तोवर कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. माझ्यासोबत दोन शक्तीशाली योद्धे आहेत थोडा धीर बाळगा आणि वेळही सांभाळा अशा आशयाचे लिओ टॉलस्टॉय यांचे वाक्य राहुल गांधींनी ट्विट केले आहे.

जी बाब मध्यप्रदेशची आहे तीच राजस्थानचीही. राजस्थानतही अशोक गहलोत की सचिन पायलट कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे नक्की व्हायचे आहे. मध्यप्रदेशचा फैसला झाल्यानंतर राजस्थानमध्येही निर्णय होणार आहे.

Story img Loader