मध्य प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सत्तेची हॅटट्रिक करीत पूर्ण बहुमत मिळवले. विजयासाठी आक्रमकताच लागते हा समज खोटा ठरवत त्यांनी भाजपला पुन्हा सत्ता मिळवून दिली. विशेष म्हणजे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून पहिली शाबासकीची थाप दिली. जास्त मतदान झाले म्हणजे प्रस्थापितविरोधी लाट असते हा समजही त्यांनी लीलया पुसून टाकला कारण मध्य प्रदेशात ७० टक्के मतदान झाले होते याचाच अर्थ भाजपच्या बाजूने सकारात्मक मतदान झाले आहे. २३० सदस्यांच्या विधानसभेत भाजपला १६४, काँग्रेसला ५९ तर इतर पक्षांना ७ जागा मिळाल्या आहेत. ‘भूमिपुत्र’ म्हणून असलेली प्रतिमा त्यांना कामी आली. त्यांच्या मंत्रिमंडळातील किमान डझनभर मंत्री या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरले असले, तरी ते स्वत: स्वच्छ आहेत. राज्यात केलेली अनेक विकासकामे ही त्यांची जमेची बाजू ठरली. पंतप्रधानपदाचे उमेदवार झालेले नरेंद्र मोदी यांचे एकही छायाचित्र मध्य प्रदेशातील पोस्टर्सवर वापरलेले नव्हते त्यामुळे हा चौहान यांच्या कार्यपद्धतीचाच विजय मानला जात आहे. दिल्लीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांनी मध्य प्रदेशातच आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चौहान यांनी बुधनी व विदिशा या दोन्ही मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला.
लाडली लक्ष्मी योजना, मुख्यमंत्री कन्यादान योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या तीन प्रमुख योजनांनी चौहान यांना हात दिला आहे. भाजपचा राज्यातील निवडणूक जाहीरनामा बघता त्यांनी दिलेली आश्वासनेही मतदारांना आकर्षित करून गेली असावीत. सुप्रशासन हा मुद्दा पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील भाजपच्या विजयाने अधोरेखित झाला आहे. विशेष म्हणजे चंबळ व महाकौशल भागात या वेळी भाजपने स्थिती आणखी मजबूत केली आहे. कोटमा येथे काँग्रेसचे मनोजकुमार आगरवाल यांनी भाजपचे राजेश सोनी यांचा १५४६ मतांनी पराभव केला. अनुपूर मतदारसंघात भाजपचे रामलाल राउतेला यांनी काँग्रेसचे बिशुलाल सिंग यांचा ११७४५ मतांनी पराभव केला. पुष्पराज गड मतदारसंघात काँग्रेसचे पुंडेलाल सिंग मारको यांनी भाजपचे सुदामा सिंग सिंगराम यांचा ३५६४७ मतांनी पराभव केला. होशंगाबाद येथे भाजपचे सीताशरण शर्मा यांनी काँग्रेसचे रविकिशोर जैसवाल यांच्यावर ४९२९६ मतांनी मात केली. वनमंत्री सरताज सिंग (भाजप) यांनी शिवनी-माळवा जागा राखली असून त्यांनी काँग्रेसचे हजारीलाल रघुवंशी यांचा १२५४७ मतांनी पराभव केला. विदिशा मतदारसंघात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काँग्रेसचे शशांक भार्गव यांचा १६९६६ मतांनी पराभव केला, तर बुधनी मतदारसंघात त्यांनी काँग्रेसचे महेंद्र सिंग यांचा ८४८०५ मतांनी पराभव केला. शिक्षणमंत्री व भाजप उमेदवार नानाभाई मोहोड यांनी सौसार मतदारसंघात काँग्रेसचे भागवत महाजन यांचा ८४१६ मतांनी पराभव केला. सावनेर येथे भाजपचे राजेश सोनकर यांनी काँग्रेसचे तुळशीराम सिलावत यांचा १७५८३ मतांनी पराभव केला. ही जागा भाजपने काँग्रेसकडून या वेळी हिसकावली आहे. शिवराजसिंह चौहान यांचे अभिनंदन करणारा पहिला ट्विट आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला तर काँग्रेसचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी मध्य प्रदेशातील विजयात ‘मोदी फॅक्टर’ चालला नाही अशी टीका केली. त्यांनी सांगितले, की मध्य प्रदेशात एकाही पोस्टरवर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची छबी नव्हती तर शिवराजसिंग चौहान यांचेच छायाचित्र होते त्यामुळे विजयाचे श्रेय मोदी यांना घेता येणार नाही. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालाचे ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत केले. मध्य प्रदेशात २००३ पासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. मतदानोत्तर चाचण्यातही भाजपला १३६ ते १४६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मध्य प्रदेशात एकूण मतदार ४ कोटी ६५ लाख असून तेथे ७० टक्के मतदान झाले होते. २००३ मध्ये भाजपला १७३ तर काँग्रेसला ३८ जागा मिळाल्या होत्या. २००८ मध्ये भाजपला १४३ तर काँग्रेसला ७१, बसपाला ७ जागा मिळाल्या होत्या. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले, की राज्यात हॅटट्रिक साधण्यात पक्षाचे प्रभारी अनंतकुमार यांचा मोठा वाटा आहे. आपण त्यांचे आभारी आहोत, त्यांनी राज्यात भाजपसाठी मोठे योगदान दिले आहे.
सुप्रशासन आणि विकासकामांच्या बळावर विजय
मध्य प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सत्तेची हॅटट्रिक करीत पूर्ण बहुमत मिळवले. विजयासाठी आक्रमकताच लागते हा समज
First published on: 09-12-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh assembly polls bjp re elected shivraj set for third term cong miserable