मध्य प्रदेशात गाय तस्करीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून ११ घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ, गायी यांच्यासह जनावरांचे अवशेष आणि हाडं सापडल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मध्य प्रदेशमधील आदिवासीबहुल जिल्हा असणाऱ्या मांडलाच्या नैनपूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. तसेच, घरांवर कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना नोटसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे नोटीसला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ होता, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही सगळी घरं सरकारी भूखंडावर होती. पोलिसांनी या प्रकरणी ११ लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी संध्याकाळी नैनपूरमधील भैन्सवाही गावात ही घटना घडली. या घरांवर छापा टाकणाऱ्या पोलीस पथकाने ११ आरोपींपैकी एकाला अटकही केली आहे. वाहिद कुरेशी असं या आरोपीचं नाव असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानही करण्यात आली आहे. आरोपींपैकी ५ ते ६ आरोपींचा याआधीही गाय तस्करी प्रकरणात सहभाग आढळून आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

चराईच्या भूखंडावर होती घरं!

मांडलाचे पोलीस अधीक्षक रजत सकलेचा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, हा १५००० चौरस फुटांचा भूखंड चराई क्षेत्र म्हणून स्थानिक प्रशासनाने जाहीर केला होता. त्यावर ही घरं बांदण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने या अतिक्रमणासंदर्भात या घरांना नोटिसाही पाठवल्या होत्या. त्यामुळे आदेश मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या घरांवर कारवाई केली.

दंगलींबाबत शाळांमध्ये शिकविण्याची गरज नाही – एनसीईआरटी

दरम्यान, गाय तस्करीबाबतही सकलेचा यांनी माहिती दिली. “या गावात याआधीही गाय तस्करीची ५ ते ६ प्रकरणं समोर आली होती. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती. यावेळी आम्हाला माहिती मिळताच तीन पथकांनिशी आम्ही कारवाई केली. त्यांनी टाकलेल्या छाप्यात या घरांमधील फ्रीजमधून बीफ ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याशिवाय जवळपास १०० जनावरं, जनावरांची हाडं तिथे सापडली. त्याशिवाय जवळपास १५० गायीदेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत”, असं ते म्हणाले.

मांडला ते जबलपूर..गाय तस्करीचं रॅकेट

मध्य प्रदेशातील मांडला ते जबलपूर या भागात हे गाय तस्करीचं रॅकेट असल्याचं पोलिसांनी सांगितलं. “या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एक नातेवाईक मोठा व्यावसायिक असून तो जबलपूरला राहतो. जनावरांची हाडं सप्लिमेंट तयार करण्यासाठी वापरण्यात येणार होती, तर त्यातलं मांस इतर उत्पादनांसाठी वापरलं जाणार होतं”, अशी माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं सांगितली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh beef news 11 houses demolished for cattle smuggling pmw