मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील एका विद्यमान आमदाराने आणि एका माजी आमदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात दोन आजी-माजी आमदारांसह भाजपाचे एकूण १० नेते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. कोलारसचे भाजपा आमदार वीरेंद्र रघुवंशी आणि माजी भाजपा आमदार भंवर सिंह शेखावत यांनी काँग्रेसचा झेडा हाती घेतला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांचं पक्षातलं वाढतं महत्त्व हे या नेत्यांच्या पक्ष बदलण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी म्हणाले, भाजपाने मध्य प्रदेशला भ्रष्टाचाराचं राज्य बनवलं आहे. ‘पैसे द्या आणि काम मिळवा’ अशी एक भ्रष्ट व्यवस्था यांनी राज्यात बनवली आहे. मुख्यमंत्री त्यांची पापं धुतली जावी म्हणून राज्यातल्या भगिनींना १,००० रुपये देत आहेत. त्यांची १८ वर्षांची पापं अशीच धुतली जातील असं त्यांना वाटतंय. परंतु, शिवराजची, तुम्ही तिकडे मुंबईत जा आणि तुमची कलाकारी करा. या निवडणुकीनंतर मध्य प्रदेशची जनता तुम्हाला खूप प्रेमाने निरोप देणार आहे.

काँग्रेस नेते कमलनाथ म्हणाले, भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशला अराजक, घोटाळ्यांचं आणि भ्रष्टाचाराचं राज्य बनवलं आहे. मध्य प्रदेशचं भविष्य वाचवायचं असेल तर जनतेनं यांच्या अमिषाला बळी पडू नये. ते वेगवेगळी अमिषं दाखवतील, परंतु शिवराजजी तुम्ही ज्यांना ज्ञान द्यायला जाताय तेच तुम्हाला निवडणुकीत ज्ञान देतील.

या भाजपा नेत्यांचा काँग्रसमध्ये प्रवेश

वीरेंद्र रघुवंशी : कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप करत भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता ते काँग्रेसवासी झाले आहेत.

भंवर सिंह शेखावत : भाजपाचे माजी आमदार, दात्तीगावमधील भाजपाचं मोठं नेतृत्व, परंतु २०१८ च्या निवडणुकीत याच मतदारसंघात त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून पुन्हा एकदा ते या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

चंद्रभूषण सिंह बुंदेला उर्फ गुड्डू राजा : झाशीतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या सुजान सिंह बुंदेला यांचे पूत्र चंद्रभूषण सिंह बुंदेला उर्फ गुड्डू राजा यांनीही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

यांच्यासह डॉ. आशीष अग्रवाल, अशू रघुवंशी, छेदीलाल पांडे, शिवम पांडे, अरविंद धाकड, डॉ. केशव यादव आणि महेंद्र प्रताप सिंह यांनी कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Story img Loader