Madhya Pradesh Fake cardiologist Case : मध्यप्रदेशच्या एका रुग्णालयात बनावट डॉक्टर युकेतील एका प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करत असल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणातील आरोपी नरेंद्र विक्रमादित्य यादव या व्यक्तीच्या देखरेखीखाली सात लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. दरम्यान नरेंद्र यादव याला अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीनंतर काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १९९० मध्ये या व्यक्तीने स्वत:चे नाव बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि इतकेच नाही तर स्वत:चं खोटं कुटुंब देखील तयार केलं होतं, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. २००६ मध्ये शस्त्रक्रियेनंतर लगेचच मृत्युमुखी पडलेले छत्तीसगडचे माजी विधानसभा अध्यक्ष यांच्या वर देखील या तोतया डॉक्टराने उपचार केल्याच्या दावा केला जातो आहे, दरम्यान याची अधिकारी चौकशी करत आहेत.

पोलिसांनी असा दावा केला आहे की, यादव याने चौकशी दरम्यान त्याच्याकडे पश्चिम बंगालमधील एका विद्यापीठाची एमबीबीएस पदवी असून त्याने पुद्दुचेरीतील एका विद्यापीठाची बनावट एमडी पदवी घेतल्याचे कबूल केले आहे.

बनवाट वैद्यकीय शिक्षण घेतल्याची कागदपत्रे सादर करून दमोह मिशन रुग्णालयात नोकरी मिळवल्याच्या आरोपाखाली त्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने डॉ. नरेंद्र जॉन कॅम (Dr Narendra John Camm) हे नाव धारून करून आपण युकेमधील हृदयरोग तज्ज्ञ आणि प्राध्यापक जॉन कॅम असल्याचा बनाव केल्याचा आरोप आहे.

“त्याने दावा केला की तो १९९९ मध्ये लंडनला गेला आणि मेडिकल कोर्स केला, पण त्यामुळे तो भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र ठरत नव्हता, म्हणून त्याने बनावट एमडी पदवी मिळवली. युकेमधील प्राध्यापक जॉन कॅन असे नाव बदलून घेण्यासाठी तो १९९९ पासून प्रयत्न करत होता. त्याने त्याचे नाव बदलण्यासाठी कानपूर येथील संबंधित विभागात कागदपत्रे देखील सादर केली, पण ते होऊ शकले नाही,” असे दमोहच्या पोलीस अधीक्षक श्रृती किर्ती सोमवंशी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

दरम्यान युकेमधील खरे डॉ. कॅम यांनी मंगळवारी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, “ओळख चोरीची ही घटना सुमारे पाच वर्षांपूर्वी उघडकीस आली होती – किमान मा‍झ्या माहितीनुसार. हे खूपच काळजीत टाकणारे होते.”

सोमवंशी यांनी सांगितले की, “आरोपीने नाव बदलून इंग्रजी वाटणारे, ख्रिश्चन नाव धारण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याला भारतीय समुदायात जास्त सन्मान मिळेल आणि नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.”

यादव याने पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो २००४ साली लंडनहून पपत आला तेव्हा त्याने दिल्लीतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये काम केले. हैदराबाद येथे काम करण्यापूर्वी तो एक कोर्स करण्यासाठी तो शिकागोला गेला. २०१० साली जर्मनीमधील न्यूरेम्बर्ग येथे दुसरा कोर्स करण्यासाठी गेल्याचा दावा देखील यादव याने केला, यानंतर २०१३ मध्ये तो भारतात परत आला. इंडियन मेडिकल असोसिएशनने त्याच्यावर बंदी घातली होती तेव्हाची ही घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

छत्तीसगडच्या माजी विधानसभा अध्यक्षांचा मृत्यू

आरोपीने छत्तीसगड येथे देखील डॉक्टर म्हणून काम केले आहे. येथे त्याच्याकडून उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांपैकी माजी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र प्रसाद शुक्ला हे देखील होते. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार शुक्ला तेव्हा छत्तीसगडच्या कोटा विधानसभेचे आमदारा होते आणि त्यांच्यावर बिलासपूर येथील अपोलो रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि २००६ मध्ये त्यांचा शस्त्रक्रिया केल्यानंतर महिनाभरात त्यांचा मृत्यू झाला. आरोपीने या रुग्णालयात अनेक रुग्णांवर उपचार केल्याचा आरोप आहे. आता या रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

शुक्ला यांच्या कुटुंबियांनी काय सांगितलं?

“माझ्या वडिलांचे (शुक्ला) ऑगस्ट २००६ मध्ये अपोलो रुग्णालयात १८ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर निधन झाले. त्यांच्यावर डॉक्टर नरेंद्र यादव यांनी उपचार केले,” असे शुक्ला यांचे धाकटे पुत्र प्रदीप (६३) यांनी फोनवरून इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

“त्यांनी सांगितले की माझ्या वडिलांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांनी शस्त्रक्रिया केली जी दोन तास चालली. माझे वडील बेशुद्ध पडले आणि त्यानंतर लगेचच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मला माहित होते की शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली नाही, परंतु माझे वडील ७६ वर्षांचे होते आणि आम्हाला रुग्णालयावर विश्वास होता,” असेही प्रदीप म्हणाले. दरम्यान आता शुक्ला यांच्या कुटुंबियांनी जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. बिलासपूर येथील पोलिसांनी त्यांना तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे.

“माझी तक्रार एफआयआर म्हणून नोंदवली जावी आणि जर दोषी आढळून आले तर तो आणि रुग्णालयातील अधिकारी यांना कठोर शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी व्यवस्थेची खिल्ली उडवली आहे… त्यांनी माझ्या वडिलांच्या उपचारासाठी लाखो रुपये घेतले. त्यावेळी येथील वैद्यकीय संघटनेने मला तो तोतया असल्याचे सांगितले होते, परंतु त्यांची बदली करण्यात आली,” असा दावा प्रदीप यांनी केला.

बिलासपूरचे मुख्य वैद्यकीय आरोग्य आधिकारी (सीएमएचओ) डॉ. प्रमोद तिवारी यांनी पु्ष्टी केली की रुग्णालयाला नोटीस पाठवण्यात आली आहे. ते म्हणाले की, “आम्हाला त्याच्या अटकेबद्दल बातम्यांमधून समजले. रुग्णालयाला नोटीस पाठवण्यात आली असून यामधून रुग्णालयाला अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यांनी या नोटीशीला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला आहे.”

अपोलो हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी देवेश गोपाळ यांच्याशी संपर्क साधला असता, “आम्हाला नोटीस मिळाली आहे आणि आम्ही माहिती देऊ. आम्ही अधिक भाष्य करणार नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.